Join us  

सिझेरियन झालं, बाळंतपणानंतर सुटलेलं पोट कमीच होत नाही? नियमित करा ३ व्यायाम, पोट होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 9:40 AM

Easy Exercise for Women belly fat after C section Fitness tips : सिझेरीयननंतरही पोट सपाट व्हावं यासाठी नेमके कोणते व्यायामप्रकार करायचे याविषयी...

गर्भधारणा आणि त्यानंतर जन्माला आलेलं बाळ ही सगळी प्रक्रिया प्रत्येक स्त्रीसाठी जितकी आनंदाची असते तितकीच ती वेदनादायीही असते. यातच सिझेरीयन प्रसूती झाली तर जास्तच काळजी घ्यावी लागते. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी सिझेरीयन प्रसूती झाल्यावर टाक्यांची काळजी घेणे, त्यामध्ये पू होऊ नये यासाठी त्यांना जपणे आणि दुसरीकडे नव्याने जगात आलेल्या लहान जीवाची काळजी घेणे असे दुहेरी आव्हान असते. हे सगळे थोडे सावरते न सावरते तोच मुलींना आपला पहिला शेप पुन्हा येणार का, आपले पोट आत जाणार का यांसारखे प्रश्न सतावतात. बाळ झाल्यानंतर मी जाड होईन, माझं पोट दिसणार यांसारख्या प्रश्नांनी काही तरुणी खचून जाण्याचीही शक्यता असते. मात्र या गोष्टीची चिंता न करता योग्य तो व्यायाम, आहाराचे नियोजन केल्यास आपली पहिली फिगर पुन्हा मिळण्यास मदत होते. पाहूयात सिझेरीयननंतरही पोट सपाट व्हावं यासाठी नेमके कोणते व्यायामप्रकार करायचे (Easy Exercise for Women belly fat after C section Fitness tips). 

१. हात वर ताणून घ्यायचे आणि एक एक पाय काटकोनात वाकवून त्याखाली दोन्ही हाताने टाळी वाजवायची. जितक्या वेळा आपला गुडघा वर येईल तितक्या वेळा आपल्या पोटावर ताण येईल आणि पोटावरची वाढलेली चरबी कमी होण्यास याचा चांगला उपयोग होईल. करायला अतिशय सोपा असलेला हा व्यायाम तुम्ही नक्कीच करु शकता. हा व्यायामप्रकार २५ चे ४ सेट असे एकूण १०० वेळा करायला हवा म्हणजे त्याचा अतिशय चांगला परीणाम दिसून येतो. सिझेरीयननंतर साधारण १.५ ते २ महिन्यांनी व्यायाम सुरू केलेला चालतो त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायामाला सुरुवात करावी. तसेच एकदम १०० वेळा न करता सुरुवातीला २५ ते ३० वेळा आणि मग हळूहळू वाढवत न्यायचे. 

२. एक हात कंबरेवर ठेवून दुसरा हात वर तिरका करायचा आणि हाताची मूठ वळायची. ज्या बाजूचा हात कंबरेवर आहे त्या बाजूचा पाय काटकोनात वर घ्यायचा आणि वर केलेल्या हाताचा कोपरा त्या गुडघ्याला टेकवायचा. त्याचप्रकारे दुसऱ्या हातानेही करावे. यामध्येही आपल्या पोटाला ताण पडल्याने आणि कंबरेवरही ताण पडल्याने या दोन्ही ठिकाणची चरबी कमी होण्यास मदत होते. 

३. मॅटवर वज्रासनात बसायचे आणि मांडीतून वर उठून हात वर घ्यायचे आणि शरीराला ताण द्यायचा. हा व्यायाम करायला अतिशय सोपा असून यामध्ये मांड्यांची हालचाल होत असल्याने त्या भागातील चरबी कमी होण्यास मदत होते. हा व्यायामप्रकारही किमान १०० वेळा अवश्य करावा. त्यामुळे पोट, कंबर, मांड्या या भागातील वाढलेली चरबी घटण्यास मदत होते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यप्रेग्नंसीव्यायाम