Join us

थंडीच्या दिवसांत गुडघेदुखीने हैराण आहात? ५ मिनीटांत करा २ सोपे व्यायाम, गुडघेदुखीपासून मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2022 11:34 IST

Easy Exercises for Knee Pain : थंडीच्या दिवसांत गुडघेदुखीने बेजार असाल तर हे सोपे व्यायामप्रकार नक्की करुन पाहा

ठळक मुद्देगुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सोपे व्यायामप्रकार थंडीत हाडांचे आणि सांध्यांचे दुखणे डोके वर काढते त्यासाठी उपयुक्त टिप्स

थंडीच्या दिवसांत खाल्लेले चांगले पचते आणि व्यायामासाठीही हा काळ चांगला असल्याने वर्षभरासाठी एनर्जी साठवून ठेवण्यासाठी या काळात आहार-व्यायाम याकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र थंडीच्या काळात अनेकांना उद्भवणारी समस्या म्हणजे हाडांचे, सांध्यांचे दुखणे. थंडी पडायला लागली की हाडांचे जुने दुखणे डोके वर काढते. अशावेळी नेमके काय करावे ते आपल्याला समजत नाही. गुडघेदुखी ही वयस्कर लोकांमध्ये सामान्यपणे दिसून येणारी समस्या आहे (Easy Exercises for Knee Pain). 

थंडीच्या काळात गुडघेदुखीच्या तक्रारी घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जात असल्याचेही आपण पाहतो. गुडघ्यांची झीज झाल्याने किंवा हाडांच्या ठिसूळपणामुळे, गुडघ्यांना योग्य वंगण न मिळाल्याने प्रामुख्याने ही समस्या उद्भवल्याचे दिसते. हीच समस्या कमी व्हावी यासाठी योगा प्रशिक्षक असलेल्या काम्या यांनी २ सोपे व्यायामप्रकार सांगितले आहेत. इन्स्टाग्रामवर योगा विथ काम्या या पेजवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. अगदी ५ ते १० मिनीटांत होणारे हे व्यायामप्रकार नियमित केल्यास गुडघेदुखीपासून आराम मिळण्यास मदत होईल असे काम्या यांचे म्हणणे आहे. पाहूयात हे व्यायामप्रकार कोणते आणि ते कसे करायचे. 

(Image : Google)

१. घोट्याची हालचाल

हा व्यायामप्रकार पाहून हा काही व्यायाम आहे का असे आपल्याला वाटू शकते. पण अतिशय सोपा असणारा हा व्यायामप्रकार आपण नियमित केल्यास गुडघ्याचे वंगण होण्यास फायदा होत असावा. जमिनीवर बसून पायाचे घोटे शक्य तितक्या पुढे न्यायची आणि मागे आणायचे. यामुळे घोट्यांबरोबरच संपूर्ण पायांच्या स्नायूंना ताण पडून गुडघ्याला याचा फायदा होऊ शकतो. 

 

२. भिंतीला टेकून करायचा घोट्यांचा व्यायाम

खांदे, पाठ, कंबर असा सगळा भाग भिंतीला टेकवून घ्यायचा. पाऊले जमिनीवर टेकवून नंतर टाचेवर बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा. चवड्याचा भाग वर उचलल्याने आपण टाचेवर येतो आणि पायाच्या मागच्या बाजू्च्या स्नायूंवर चांगला ताण पडतो. हे व्यायामप्रकार तुमच्या पालकांना आणि आजी-आजोबांनाही करायला सांगा असेही काम्या आवर्जून सांगतात. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम