Join us  

दिवसभर कॉम्प्युटरवर काम केल्याने खांदे, मान खूप दुखतात? ४ सोपे व्यायाम, मिळेल झटपट आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 4:20 PM

Easy Exercises for Neck and Shoulder Pain : घरच्या घरी अगदी बसल्या बसल्या काही सोपे व्यायामप्रकार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.

ठळक मुद्देदिवसभराच्या बैठ्या कामाने मान आणि खांदे असह्य दुखतात अशावेळी काय करावं याविषयी...जाता-येता सोपे व्यायाम केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो

आपल्यापैकी बहुतांश जण दिवसभर कॉम्प्युटरवर काम करतात. बैठ्या जीवनशैलीमुळे आपल्याला लठ्ठपणा, मधुमेह किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सतावतातच. पण बैठ्या कामामुळे सतावणारी आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे अंगदुखी किंवा हाडांचे दुखणे. अनेकदा आपले अंग इतके दुखते की आपल्याला काहीच सुचत नाही. यामध्ये प्रामुख्याने पाठ, खांदे आणि मानदुखीचा त्रास सर्वात जास्त असतो. दिवसभर बसून असल्याने पाठ आणि मान खूपच अवघडते. कधी कधी तर हे दुखणे इतके वाढते की डॉक्टरांकडे जाण्याशिवाय काही मार्गच उरत नाही. पण असे करण्यापेक्षा घरच्या घरी अगदी बसल्या बसल्या काही सोपे व्यायामप्रकार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. मानेचे आणि खांद्याचे दुखणे कमी करण्यासाठी काय करायचे पाहूया (Easy Exercises for Neck and Shoulder Pain)....

(Image : Google)

१. पश्चिम नमस्कारासन  

दोन्ही हात मागे पाठीच्या मध्यमभागी घेऊन दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करावा. हातांचा नमस्कार घातल्याने खांद्यांन, दंडांच्या स्नायूंना चांगलाच ताण पडतो आणि खांदेदुखीपासून काही प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते. 

२. उष्ट्रासन

दिसायला अतिशय साधे आणि सोपे वाटणारे हे आसन आहे. मात्र प्रत्यक्ष करताना त्यामध्ये पाठीला, खांद्यांना आणि एकूणच शरीराला बराचसा ताण पडतो. यामुळे खांदे आणि मान यांचे दुखणे काही प्रमाणात कमी होऊ शकते. 

३. मानेचे व्यायाम

मान गोलाकार फिरवणे, डावीकडे आणि उजवीकडे फिरवणे तसेच वर, खाली फिरवणे यांसारख्या सोप्या गोष्टीही आपण दिवसभरात कामाच्या नादात करत नाही. मात्र मधे वेळ मिळाला की मानेचे हे सोपे व्यायाम करणे अतिशय उपयुक्त ठरते. 

(Image : Google)

४. हाताचे स्ट्रेचिंग 

अनेकदा आपण कीबोर्डवर किंवा मोबाइलवर काही ना काही टाइप करत असतो. किंवा हात पुढच्या दिशेने काम करत असतात. अशावेळी खांद्यांवर ताण येण्याची शक्यता असते. अशावेळी हात मागच्या बाजूला, वरच्या बाजूला ताणणे अतिशय परिणामकारक ठरु शकते. यामुळे खांद्यांचा, मानेचा ताण कमी होण्यास मदत होते. याशिवाय एक हात वरच्या बाजुने आणि एक हात खालच्या बाजूने एकमेकांत लॉक करायचाही प्रयत्न करु शकता. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सलाइफस्टाइलआरोग्यव्यायामयोगासने प्रकार व फायदे