दिवसभर लॅपटॉपसमोर एकाच अवस्थेत बसल्याने खांदेदुखीची समस्या उद्भवते. शरीराची दिवसभर पुरेशी हालचाल होत नसल्याने पाठदुखी आणि खांदेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. हात, शरीर आणि मान यांना जोडणारा हा भाग कोणत्याही प्रकारचा ताण आला की दुखू शकतो. खांदे सतत दुखत असतील तर त्याकडे जास्त दुर्लक्ष न करता वेळीच योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. हाडांची ठिसूळता, स्नायूंमधील वंगण कमी होणे, सांध्यांना सूज येणे ही खांदेदुखीची काही महत्त्वाची कारणे असू शकतात. एकदा शरीराची ठेवण चुकीची झाली की ती पुन्हा पूर्ववत व्हायला वेळ लागतो. खूप प्रयत्न करुनही त्यामध्ये फारसा फरक पडत नाही. खांदे वाकलेले असतील तर आपल्यामध्ये आत्मविश्वास नाही असे जाणवते. त्यामुळे खांदेदुखीचा त्रास दूर होण्यासाठी फिटनेसतज्ज्ञ जूही कपूर काही सोपे उपाय सांगतात, ते कोणते पाहूया....(Easy Remedies for Shoulder Pain).
१. वॉल पपी पोज
कुत्र्याचे पिल्लू ज्याप्रमाणे दोन पाय पुढे करुन शरीराला ताण देते त्याचप्रमाणे शरीराला ताण द्यायला हवा. हातापासून छातीपर्यंतचा भाग भिंतीला चिकटवून ठेवून ताण दिल्यास खांद्यांना ताण पडतो आणि खांदेदुखी कमी होण्यास मदत होते.
२. स्ट्रेचिंग
भिंतीला एका बाजुने टेकून उभे राहायचे. कंबरेपासूनचा सगळा भाग भिंतीला टेकवून हात खांद्यातून वर ताणायचा. असे दोन्ही बाजुने करायचे. अगदी झटपट होणारे हे सोपे व्यायामप्रकार आणि मधल्या वेळातही अगदी सहज करु शकतो.
३. डॉल्फीन पोज
भिंतीच्या समोर काही अंतर ठेवून उभे राहायचे. भिंतीला दोन्ही हात कोपरापर्यंत टेकवून खांद्यातून आणि कंबरेतून खाली वाकायचे आणि पुन्हा उभे राहायचे. असे किमान ६ ते ८ वेळा करायचे. याने खांद्यांना चांगला ताण पडण्यास मदत होते.