काही अभिनेत्री सध्या चित्रपटात अभिनय करत नसल्या किंवा कमी करत असल्या तरी त्या प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य करत असतात. त्या कोणत्याही कार्यक्रमानिमित्त दिसल्या तरी प्रेक्षकांना त्यांचं न बदललेलं रुप दिसतं. आपल्याला आवडणारी अभिनेत्री आजही पूर्वीसारखीच दिसते हे बघून प्रेक्षकही सुखावतात. जुही चावला या अभिनेत्रीला बघून ती 53 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही . तिच्या चेहेर्याच्या ताजेपणावर, फिटनेसवर तिच्या वयानं अजूनही कोणताच परिणाम केलेला नाही. कोणालाही कुतुहल वाटेल अशा जुहीच्या सौंदर्याचं रहस्य आहे योग अभ्यासात. आपल्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन जुही आपल्या योगअभ्यासाबद्दल बोलत असते, त्याचे फोटो टाकत असते.
छायाचित्र:- गुगल
इतर महिलांनीही आपल्यासारखंच तरुण दिसण्यासाठी, वाढत्या वयात फिट राहाण्यासाठी योगअभ्यास करावा या उद्देशानं जुही या पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकत असते.
पद्मासन, वृक्षासन, बालासन ही तीन आसनं जुहीच्या चमकदार त्वचेचं आणि फिटनेसचं रहस्य आहे. या तीन आसनांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगले परिणाम होतात.
पद्मासन
जुही चावलाला पद्मासन करायला आवडतं. हे आसन करतानाचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पद्मासन करण्याची पध्दत आणि फायदे याबद्दलही जुही सांगते.
पद्मासन करण्यासठी आधी अर्ध पद्मासनात बसावं. डावा पाय उजव्या मांडीवर ठेवावा. नंतर उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवावा. गुडघे जमिनीला स्पर्श करतील असं बसावं. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर ठेवावेत. या स्थितीत काही मिनिटं, काही सेकंद राहिलं की हाच प्रकार दुसर्या पायानं करावा.
छायाचित्र:- गुगल
पद्मासन ही एक ध्यान मुद्रा आहे. ध्यानासाठी या आसनात बसणं फायदेशीर ठरतं. हे आसन डोकं शांत करतं. पद्मासनामुळे पाठीचा कण्यातून ऊर्जा निर्माण होते. या आसनामुळे पाठीचा कणा ताठ राहातो, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या आसनामुळे मासिक पाळीच्या समस्या दूर होतात, कंबरदुखी थांबते. सांधेही लवचिक होतात.
वृक्षासन
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जुही चावला वृक्षासनही करते. वृक्षासन हे शरीर आणि मेंदू या दोन्हीसाठी खूप फायदेशीर असतं. या आसनाचा फोटोही जुहीने इन्स्टाग्रामवर टाकला आहे. आणि फोटोला ‘आपला योग आणि आयुर्वेदावर विश्वास आहे’ अशी कॅप्शन दिली आहे.
छायाचित्र:- गुगल
वृक्षासनासाठी सर्वात आधी सरळ उभं राहावं. नंतर उजवा पाय मुडपून तो डाव्या पायाच्या जांघेच्या आतल्या भागात ठेवावा. पायाची बोटं ही खालच्या दिशेनं असायला हवीत. उजवा पाय हा डाव्या पायाच्या रेषेतच असायला हवा. सोबतच डाव्या पायावर शरीराचा तोलही सांभाळायला हवा. शरीराचा तोल नीट सांभाळला गेला की दीर्घ श्वास घ्यावा. नंतर ह्ळू हळू दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन नमस्कार मुद्रेत ठेवावे. पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीर हे ताणलेलं असावं. काही वेळ या स्थितीती राहिल्यानंतर हे आसन सोडावं आणि मग हीच क्रिया डाव्या पायानं करावी.
वृक्षासनामुळे चेतातंतू आणि चेतास्नायू यांचं कार्य सुधारतं. या आसनामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात. वृक्षासनामुळे मेंदू सजग राहातो. कामातली एकाग्रता वाढते. टाचांचं दुखणं असल्यास ते कमी होतं. शिवाय शरीराची लवचिकता वाढते. वृक्षासनामुळे चेहेर्यावरची चमक वाढते.
छायाचित्र:- गुगल
बालासन
स्वत:ला फिट आणि तरुण ठेवण्यासाठी जुही चावला बालासन करते. बालासन याला ‘चाइल्ड पोस्ट’ असंही म्हटलं जातं. हे आसन बघायला गेलं तर खूपच सहज सोपं वाटतं. पण या आसनाचे फायदे मात्र खूप आहेत. बालासनातील एक फोटो पोस्ट करुन त्याला जुहीनं ‘मला नम्रता आणि दयाळूपणा यावर विश्वास आहे. निसर्ग आणि शाश्वत दिव्य प्रकाशावर माझा विश्वास आहे’ अशी कॅप्शन दिली आहे.
बालासन करताना आधी वज्रासनात बसावं. दीर्घ श्वास घेत शरीराचा वरचा भाग पुढाच्या दिशेनं झुकवावा. दोन्ही हात पाठीमागे ठेवून कपाळ जमिनीवर टेकवावं. जितका वेळ शक्य आहे तितका वेळ या स्थितीत राहावं. मग श्वास सोडत शरीराचा वरचा भाग सरळ करत पुन्हा वज्रासनात बसावं. असं किमान पाच वेळा तरी करावं.
बालासनामुळे शरीराला आराम मिळतो. हे आसन नियमित केल्यास अंगदुखी जाते. या आसनामुळे पाठ, नितंब,मांड्या आइ घोटे यावर ताण येतो. कंबरदुखीही या आसनामुळे कमी होते.
या आसनामुळे बध्दकोष्ठता दूर होते आणि पचन क्रिया सुधारते. बालासनामुळे मज्जातंतूच कार्य सुरळीत राहून मानसिक आरोग्य चांगलं राहातं. शिवाय शरीरातील रक्तप्रावह सुधारतो, वाढतो त्यामुळे शरीरावर आलेला ताण निघून जातो.