आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जण व्यायाम आणि योग्य आहाराचे सेवन करत आहे. काही जण जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत, तर काही जण योग शाळेत जाऊन योगाचे धडे गिरवत आहेत. काहींना या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ देता येत नाही. त्यांना जिम अथवा योग शाळेत जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा स्थितीत घरच्या घरी आपण वर्कआउट करू शकता. हे वर्कआउट २० मिनिटांचे असून, आपण हा व्यायाम दिवसा कधी ही वेळ मिळाला तरी करू शकता. हे वर्कआउट करताना कोणत्याही हेवी वजनांची गरज नाही. आपण हा वर्कआउट इक्वीपमेंट शिवाय देखील करू शकता.
२० मिनिटांचा व्यायाम
शरीराला मस्कुलर बनवण्यासाठी रोज व्यायाम करणे आवश्यक. यासाठी दिवसातून २० मिनिटांचा व्यायाम घरीच करा. या २० मिनिटांच्या वर्कआउटमध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. या वर्कआउटची माहिती फिटनेस ट्रेनर गौरव मौलारी यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी वर्कआउटचे विविध व्यायाम सांगितले आहे.
स्क्वॅट्स आणि लंजेस
स्क्वॅट्स आणि लंजेस हा व्यायाम पायांसाठी फायदेशीर आहे. याने पायातील स्नायू मजबूत होतात. स्क्वॅट्स क्वाड्स, हॅमस्ट्रिंग्स आणि काफवर प्रभावी ठरतात, तर लंजेस ग्लूट मॅक्झिमस, हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्स मजबूत करतात. स्क्वॅट्स केल्याने नितंबांचे सर्व स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे पाय आणि हिप्स टोन्ड राहतात.
ग्लूट ब्रिज
ग्लूट ब्रिज या व्यायामाचा प्रभाव नितंबांच्या स्नायूंवर होतो. या व्यायामाच्या मदतीने, कोर स्नायू देखील मजबूत केले जाऊ शकतात. यासह पेल्विक मसल्स मजबूत होण्यास मदत मिळते. या व्यायामाने ग्लूट मजबूत होतात, यासह हिप्स आकारात येतात.
पुश - अप्स
पुश - अप्स हा एक उत्तम शारीरिक व्यायाम आहे. जो छाती, ट्रायसेप्स आणि खांद्याच्या स्नायू तयार करण्यास मदत करतात. यासह शरीरातील मूळ स्नायूंवरही परिणाम होतो. रोज पुश अप्स केल्याने आपल्या शरीराचा वरील भाग आणि धड हे अधिक मजबुत आणि कणखर बनतात.
यासह आपण हे व्यायाम देखील करू शकता
एल्बो टू शोल्डर
प्लँक
बाइसिकल क्रंच
टो टच
प्रत्येक व्यायामाच्या ५ फेऱ्या करा. प्रत्येक व्यायाम ३० सेकंद सतत करा आणि नंतर ३० सेकंद विश्रांती घ्या. अशा प्रकारे तुमची एक फेरी पूर्ण होईल. धकाधकीच्या जीवनात जर स्वतःसाठी वेळ मिळत नसेल तर, हा व्यायाम नक्की ट्राय करा.