शरीराच्या इतर भागांसाठी जसे व्यायाम असतात, तसेच डबल चीन म्हणजेच हनुवटीच्या खाली वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीही काही व्यायाम नक्कीच आहेत. अवघ्या पाच ते सात मिनिटांत हे व्यायाम करता येतात. हे व्यायाम प्रकार अतिशय परिणामकारक असून नियमित केल्यास काही महिन्यांमध्येच लक्षणीय फरक दिसून येऊ शकतो. फक्त व्यायामात सातत्यता असणे गरजेचे आहे. असे केले तर लवकरच तुम्हीही तुमच्या डबल चीनला म्हणू शकता.... बाय ... बाय.....
करून बघा हे सोपे उपाय१. फीश फेसहा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात आधी ओठांचा चंबू करायचा. ओठांचा चंबू म्हणजे सेल्फीसाठी आपण पाऊट करतो, त्याप्रमाणे ओठ जोडायचे आणि गाल आतमध्ये ओढायचे. २० ते २५ सेकंदासाठी ही स्थिती ठेवायची आणि सोडून द्यायची. अशाच पद्धतीने २ ते ३ वेळा करायचे. यामुळे चेहऱ्याचा व्यायाम होतो आणि त्या भागातील चरबी कमी होण्यास मदत होते.
२. जीभ ताणणेहा दुसरा आणि सोप्या प्रकारचा व्यायाम आहे. यामध्ये सगळ्यात आधी एका ठिकाणी ताठ बसा. यानंतर छताकडे मान आणि डोळे वळवा. अशाच अवस्थेत असताना जीभ ओठांच्या एका टोकाकडून बाहेर काढून वरच्या बाजूच्या दिशेने वळवा आणि तिला जरा ताण पडू द्या. १० सेकंद असे केल्यानंतर आता ओठांच्या दुसऱ्या टोकाकडून तशाच पद्धतीने जीभेला ताण द्या. ४ ते ५ वेळा ही क्रिया करावी.
३. चीन मसाज हनुवटी आणि जॉ लाईनला योग्य पद्धतीने मसाज केल्यामुळेही डबल चीन कमी होऊ शकते. मसाज कशा पद्धतीने करावा, याच्या काही टिप्स आहेत. सगळ्यात आधी तर अनामिका आणि मधले बोट आपल्या जबड्याच्या हाडाच्या दोन्ही बाजूच्या शेवटच्या टोकांवर ठेवा. यानंतर आधी एक हात मसाज करत हनुवटीपर्यंत आणा. अशाच पद्धतीने दुसऱ्या हातानेही मसाज करा. प्रत्येक हाताने १०- १० वेळेस अशा पद्धतीने मसाज करा.
४. नेक टिल्टयामध्ये सगळ्यात आधी एका जागेवर ताठ बसा किंवा ताठ उभे रहा. यानंतर तुमची मान पुर्णपणे एका बाजूला वळवून घ्या आणि वरच्या बाजूला बघून मानेला ताण देण्याचा प्रयत्न करा. असे दोन्ही बाजूने करावे. असे एका बाजूने कमीतकमी ५ वेळेला आणि प्रत्येक वेळी किमान १० सेकंदासाठी तरी करावे.
५. 'ओ' आणि 'ई' करा..हा अतिशय मजेशीर व्यायाम आहे. यामध्ये 'ओ' म्हणताना आणि 'ई' म्हणताना आपल्या ओठांची जशी हालचाल होते तशी करावी. आधी 'ओ' सारखे करावे नंतर 'ई' सारखे करावे. १० ते १५ वेळेला ही प्रक्रिया करावी.
६. वर बघा आणि चावाहा व्यायाम करताना मान वर करा आणि छताकडे बघा. यानंतर आपल्या तोंडात काहीतरी आहे आणि आपण चावत आहोत, अशा पद्धतीने तोंडाची आणि दातांची हालचाल करा. गळ्याची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे.