पोट आणि कंबरेवरची चरबी वाढायला सुरुवात होणं, म्हणजे आपलं शरीर बेढब होण्याकडे वाटचाल करत आहे, हे लक्षात घ्यावं... त्यामुळे जर आपला बांधा सुडौल (how to reduce belly fat?) ठेवायचा असेल म्हणजेच फिगर मेंटेन ठेवायची असेल, तर कंबर आणि पोट यांच्यावर ताण येईल, असे वर्कआऊट नियमितपणे करायला पाहिजे. योगा प्रकारात काही आसने खास कंबर आणि पोट यांच्यावरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे जर पोट सपाट आणि कंबर रेखीव, कमनिय व्हावी, असं वाटत असेल तर ही योगासने (yoga for reducing belly fat) नियमित करा.
१. भुजंगासनभुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपा. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवा. यानंतर चेहरा, मान, पाठ, कंबर उचलून घ्या. हात कोपऱ्यातून वाकलेले असू द्या. नजर छतावर केंद्रित करा. या अवस्थेत दोन्ही पायचे अंगठे एकमेकांना जाेडण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे पोटावर ताण पडतो, पचनक्रिया सुधारते, त्यामुळे पोटावरची चरबी कमी हाेण्यास मदत होते.
२. नौकासननौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. त्यानंतर दोन्ही पाय ४० डिग्री कोनात उचला. दोन्ही हात पायांच्या दिशेने समांतर ठेवा. मान, पाठ, कंबर उचलून घ्या आणि या अवस्थेत ३० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोटाच्या आणि कंबरेच्या स्नायुंवर ताण येतो. पचन क्रिया आणि चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे शरीरावर चरबी साचून राहात नाही.
३. उष्ट्रासनउष्ट्रासन करण्यासाठी वज्रासनात बसा. यानंतर गुडघ्यावर उभे रहा. दोन्ही हात हळूहळू मागे न्या आणि हाताने पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. मान मागच्या बाजूने खाली झुकवा. तुमच्या मागच्या बाजूची भिंत दिसली पाहिजे, अशा पद्धतीने मानेची स्थिती ठेवा. पोटाची चरबी कमी हाेण्यासोबतच खांदे आणि दंड याठिकाणचे स्नायू मजबूत होण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते.
४. धनुरासनधनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा. यानंतर पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडा. यानंतर मान, छाती वर उचलण्याचा प्रयत्न करा. मांड्या उचलण्याचा प्रयत्न करा. ही आसन अवस्था काही सेकंद टिकवून ठेवा.