Join us  

रात्री जेवणानंतर करा 3 व्यायाम, पचनाचा त्रास होईल कमी - वजन कमी होण्यासाठीही फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2022 1:48 PM

रात्रीच्या जेवणानंतर व्यायाम (exercise after dinner) करु नये हा नियम आहे. पण योगाभ्यासात खास पचनासाठी आणि झोप चांगली लागण्यासाठी रात्री जेवणानंतर (yogasanas for improve digestion) करावयाचे विशेष योग आसनं सांगितली आहे.

ठळक मुद्देवज्रासन, अर्धचंद्रासन आणि गोमुखासन ही तीन योगासनं रात्री जेवणानंतर केल्यास पोट जड वाटत नाही. पचनशक्ती मजबूत होते. यासोबतच पोटाची चरबी कमी होण्यास आणि रात्री शांत झोप लागण्यास मदत होते. 

रात्रीच्या जेवणानंतर व्यायाम (exercise after dinner)  करु नये हा नियम असला तरी पचन नीट होण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी विशिष्ट योगआसनं  (yogasanas after dinner for improve digestion) करण्याचा सल्ला योग तज्ज्ञ देतात. वज्रासन, अर्धचंद्रासन आणि गोमुखासन ही तीन योगासनं रात्री जेवणानंतर केल्यास पोट जड वाटत नाही. पचनशक्ती मजबूत होते. यासोबतच पोटाची चरबी कमी होण्यास आणि रात्री शांत झोप लागण्यास मदत होते. 

Image: Google

वज्रासन

रात्रीच्या जेवणानंतर वज्रासन केल्यास अन्न पचण्यास् मदत होते. पोटाचे अनेक आजार दूर होतात.  पचनासोबतच हे आसन वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी, शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी वज्रासन केल्यानं फायदा होतो. वज्रासन करण्यासाठी योगा मॅटवर / सतरंजीवर गुडघ्यावर बसावं. गुडघ्यावर बसताना दोन्ही पायाचे अंगठे ऐकमेकांजवळ हवेत. शरीराचा पूर्ण भार दोन्ही पायांच्या तळव्यावर ठेवावा. या अवस्थेत ताठ आणि आरामशीर बसावं. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवावं. मान सरळ ठेवावी.  वज्रासनात कमीत कमी 5 मिनिटं बसावं. 

Image: Google

अर्ध चंद्रासन

तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर करण्यासाठीचं उत्तम आसन म्हणजे अर्ध चंद्रासन . हे आसन उभं राहून करतात. हे आसन करताना कमरेच्या दोन्ही बाजूंवर ताण येतो. यामुळे पचन सुधारण्यास आणि कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. अर्ध चंद्रासन करण्यासाठी जमिनीवर ताठ उभं राहावं. दोन्ही पायात एक ते दीड फुटांचं अंतर ठेवावं. मान सरळ  समोरच्या दिशेने ठेवावी. उजवा हात खांद्यातून कानाला खेटून सरळ वर उचलावा. डावा हात डाव्या पायाला खेटून असावा. उजवा हात कमरेतून वाकत शक्य तितका डाव्या बाजूनं झुकवावा. यामुळे कमरेच्या उजव्या बाजूला ताण येतो. या स्थितीत 30 ते 40 सेकंद राहिल्यानंतर  सरळ होत आणि हात खाली नेत आसन सोडावं. मग हेच  आसन  डावा हात  वर नेत उजव्या बाजूनं झुकत करावं. या अवस्थेत कमरेच्या डाव्या बाजूला ताण येतो. अर्धचंद्रासन दोन्ही पाय एकमेकांजवळ वर सांगितल्याप्रमाणेही करता येतं. उत्तम परिणामांसाठी अर्धचंद्रासन पाय लांब ठेऊन आणि पाय जवळ ठेवूनही करावं.

Image: Google

गोमुखासन

योग तज्ज्ञांच्या मते गोमुखासनामुळे पाठ आणि पोटाच्या स्नायूंवर ताण येतो. हे आसन केल्यानं पचन क्रिया सुलभ होते. 

गोमुखासन करण्यासाठी योगा मॅटवर किंवा सतरंजीवर बसावं. बसताना डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या नितंबाखाली ठेवावा. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवावा. या स्थितीत  दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांवर येतील. उजव्या पायाची टाच डाव्या दिशेच्या नितंबाजवळ खेचून घ्यावी.जो पाय खाली आहे त्या बाजूचा हात पाठीवर ठेवून कोपरात वाकवावा. मग उजवा हात वर करुन पाठीवरुन खाली आणत उजव्या हातानं डावा हात पकडावा किंवा पकडण्याचा प्रयत्न करावा. पाठ सरळ रेषेत ठेवावी. मान समोर ठेवावा.  या स्थितीत  एक मिनिटं राहिल्यानंतर उजवा हात खाली आणावा. डावा हात मूळ स्थितीत आणावा. मग हेच आसन उजवा पाय डाव्या नितंबाखाली ठेवत करावं. हे आसन करताना लक्ष श्वासावर केंद्रित करावं.  

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स