आपण छान दिसावं असं प्रत्येक तरुणीला आणि स्त्रीला वाटतं. सौंदर्यामध्ये चेहऱ्यासोबतच आपला बांधाही सुडौल असावा अशी प्रत्येकीची इच्छा असते. म्हणूनच आपण जाड झालो की आपल्याला थोडं टेन्शन येतं आणि शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करतो. स्तन हे महिलांच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा अवयव असून काही वेळा ते खूप ओघळल्यासारखे दिसतात (Easy Exercises Useful for Breast Sagging).
अशावेळी स्तन ओघळले म्हणून आपल्याला टेन्शनही येतं. स्तनांच्या अशा ठेवणीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधी ब्रेसियर उशीरा वापरण्यास सुरुवात केल्यामुळे तर कधी लठ्ठपणामुळे, कधी ब्रेस्ट फिडींगमुळे तर कधी आणखी काही कारणांनी मुलींचे स्तन सैल पडतात.
एकदा हे स्तन सैल पडले की ते ताठ होण्यासाठी काय करावे आपल्याला कळत नाही. मग नकळत आपण निराश होतो आणि अनेक मुलींमध्ये तर या कारणामुळे आत्मविश्वासही कमी होतो. पण काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते. द योगिनी वर्ल्ड या इन्स्टाग्राम पेजच्या माध्यमातून जूही कपूर यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी अतिशय सोपे आणि झटपट होतील असे ३ व्यायामप्रकार सांगितले आहेत. हे व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास स्तनांची ठेवण सुधारण्यास नक्कीच मदत होते.
त्या सांगतात, ब्रेस्ट हा स्नायू नसून ते चरबीयुक्त असतात त्यामुळे ते टोन्ड असतातच असे नाही. पण त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या स्नायूंचे व्यायाम केल्याने ब्रेस्टचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायामाचा नक्की उपयोग होतो. व्यायामाने आपण स्तन सैल पडणे आपण लांबवू शकतो. तसेच या व्यायामांमुळे खांदे आणि छातीच्या स्नायूंमध्ये ताकद येते आणि त्यामुळे ब्रेस्टला चांगला आधार मिळण्यास मदत होते. यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेला प्रत्येक व्यायामप्रकार ३० वेळा असे ३ सेट करावेत. मात्र स्तन ओघळले असतील तरी जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यायला हवे.