कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर आपण सगळेच घरातून बाहेर पडायला लागलो आणि आपले दैनंदिन जीवन काहीसे सुरळीत झाले असे म्हणायला हरकत नाही. थंडीचा काळ सुरू झाल्यानंतर अनेकांनी व्यायामाला सुरुवात केली असेल. कोणत्याही प्रकारचा व्यायाम आरोग्यासाठी चांगलाच. व्यायामामुळे तुमचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते, शांत झोप लागते, मूड चांगला व्हायला मदत होते. पण हा व्यायाम तुम्ही एकटेच करत असाल तर थांबा. ग्रुपनी किंवा एकत्र व्यायाम करण्यामुळे त्याहून जास्त फायदा होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. एकट्याने व्यायाम करताना अनेकदा कंटाळा येतो, मग काही ना काही कारणे देऊन दांड्या मारल्या जातात. पण त्यापेक्षा व्यायामाला तुमच्यासोबत छान ग्रुप असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच जास्त फायदा होईल.
जरनल ऑफ अमेरिकन ऑस्टीओपॅथिक असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधात एकटे आणि एकमेकांसोबत व्यायाम करणाऱ्यांबाबत संशोधन करुन काही तथ्ये मांडण्यात आली आहेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांना एकटे किंवा दोघांनी मिळून ठराविक व्यायाम करायला सांगण्यात आले तर काही जणांना तितकाच वेळ ग्रुपने व्यायाम करायला सांगण्यात आले होते. काही आठवड्यानंतर दोन्ही प्रकारच्या लोकांशी बोलून काही निष्कर्ष काढण्यात आले. तर ग्रुपने व्यायाम करणाऱ्यांना व्यायामाचा सर्व दृष्टीने जास्त फायदा होत असल्याचे दिसले. तर इंटरनॅशनल जरनल ऑफ स्पोर्ट अँड एक्सरसाइज सायकॉलॉजी मध्ये आणखी एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये काही लोकांना ४५ मिनिटांसाठी रोइंग मशिनवर व्यायाम करण्यास सांगण्यात आले. यामध्ये ज्यांनी ग्रुपमध्ये ही अॅक्टीव्हीटी केली होती त्यांची दुखणे सहन करण्याची क्षमता एकट्याने रोइंग करणाऱ्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे समोर आले. एकमेकांसोबत व्यायाम केल्याने लोकांच्या शरीरात एन्डोर्फीन हे फिल गुड हार्मोन तयार झाले आणि त्यामुळे त्यांची सहन करण्याची क्षमता वाढली. अशाप्रकारे आणखीही काही अभ्यास कऱण्यात आले, ज्यातून एकत्रित व्यायाम करणे जास्त फायदेशीर असल्याचे समोर आले आहे.
एकत्र व्यायाम करण्याचे फायदे
१. एकमेकांसोबत व्यायाम केल्याने तुम्ही एकमेकांच्या मदतीने नियमित व्यायामापेक्षा थोडा जास्त व्यायाम करता.
२. हसत खेळत केलेला व्यायाम कधीही शरीराबरोबरच मनालाही ताजेतवाने करण्यास मदत करतो.
३. आपण एकटे व्यायाम करत असलो तर आपल्याला व्यायामाला काही मर्यादा येतात, मात्र अनेक जण सोबत असतील तर आपण अनेक नवीन गोष्टी शिकतो आणि नवनवीन प्रयोग करतो
४. एकमेकांकडून प्रेरणा घेऊन व्यायाम केल्याने व्यायामाच्या गुणवत्तेतही फरक पडतो.
५. एकत्र व्यायाम करत असू तर एखादा प्रशिक्षक किंवा ग्रुप लिडर असतो, त्याचे सर्वांकडे लक्ष असल्याने व्यायाम करताना चुकारपणा किंवा कंटाळा केला जात नाही.
६. एकमेकांसोबत व्यायाम केल्याने लोकांच्या शरीरात एन्डोर्फीन हे फिल गुड हार्मोन तयार होते आणि याची तुमचा मूड फ्रेश व्हायला मदत होते.
७. एकत्रित व्यायामात तुम्ही कितीही थकलात तरी सगळ्यांसोबत पुढे जाण्याची उर्मी असते. त्यामुळे तुमच्या क्षमता आणि सहनशक्ती वाढायला मदत होते.