व्यायाम करणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पण, आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात होणं आवश्यक असतं. गरजेपेक्षा कमी प्रमाणात व्यायाम होत असेल, तर ते सहजपणे लक्षात येऊ शकतं. पण, शारीरिक गरजेपेक्षा अधिक व्यायाम करणं देखील फायद्याचं नाही. अधिक व्यायाम करणं म्हणजे अधिक फायदा हा गैरसमज मनात असल्यास तो आधी काढून टाका. नियमित व्यायाम न केल्याने मधुमेहापासून ते हृदयविकारापर्यंत असे अनेक आजार शरीरात उद्भवतात. अशा समस्यांचा धोका कमी करण्यासाठी, आरोग्यतज्ञ नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देतात. मात्र, गरजेपेक्षा अधिक व्यायाम केले तर त्याचा फटका आपल्या शरीरावर होऊ शकतो. आजार बरे होण्यापेक्षा दुसरे आजार शरीरात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गरजेपेक्षा अधिक व्यायामाचे अनेक तोटे
अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) नुसार, सर्वांनी शरीर निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम केले पाहिजे.काही लोकं कमी वेळेत अधिक फायदा मिळविण्यासाठी दिवसातून दोन ते तीन तास व्यायाम करताना दिसून येतात. आरोग्य तज्ञ म्हणतात की "आठवड्यातून 300 मिनिटांपेक्षा जास्त व्यायामामुळे शारीरिक "बर्नआउट" होऊ शकते, ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीरात उद्भवतात".
थकवा आणि ऊर्जा कमी होणे
व्यायाम करताना शरीरातील कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. गरजेपेक्षा अधिक व्यायाम केले तर कॅलरी बर्न होण्याचा धोका अधिक वाढू लागतो. ज्यामुळे तीव्र थकवा आणि उर्जेची कमतरता भासते. भरपूर व्यायाम केल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते, अशा स्थितीत दिवसभर ऑफिस किंवा इतर कामं करणं कठीण होऊन बसतं.
हृदयाच्या समस्यांचे कारण
जर्मन शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक जास्त व्यायाम करतात त्यांच्यामध्ये कालांतराने हृदयाच्या निगडित समस्या निर्माण होतात. हृदयावर जास्त दबाव आल्याने त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते, याशिवाय अधिक व्यायामामुळे, हृदयाची गती देखील लक्षणीय वाढू लागते. हृदयविकाराच्या वाढीच्या स्थितीमुळे, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या गंभीर परिस्थितीचा धोका निर्माण होतो.
स्नायू दुखणे
जड वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने सांधेदुखी सारख्या समस्याचा धोका अधिक वाढतो. याशिवाय, स्नायूंच्या समस्याही वाढू शकतात. अतिव्यायाम केल्याने सांध्यांवर दाब येतो, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास अधिक वाढतो. यामुळे स्नायू दुखणे आणि हाडांच्या अनेक प्रकारच्या समस्या देखील होऊ शकतात. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम मध्यम पातळीवर केला पाहिजे.