चांगली जीवनशैली, आहार, नियमित व्यायाम अशा काही सवयी आहेत ज्या तुम्हाला मेंटेन ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. एक निरोगी शरीर वेगवान आणि सकारात्मक विचारांसाठी पोषक मानलं जातं. जर तुम्हाला नेहमी फिट राहायचं असेल तर काही गोष्टी नियमित करणं गरजेचं आहे. रोजच्या कामातून वेळ काढून जिमला जाणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. घरात जे काही बनवलं असेल ते खाऊन लोक दिवस काढतात. त्यातून आपल्याला पुरेसे पोषक तत्व मिळत आहेत की नाही याचा विचार केला जात नाही. असं करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा तुमच्या शरीरात एनर्जी असते आणि शरीरात काही बदल होतात. ज्याला तुम्ही तब्येतीचे गुड साईन्स म्हणू शकतात.
डॉक्टर हरिकृष्ण पांडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तुमचं शरीर निरोगी आहे की नाही हे शरीरात होणारे बदल सांगतात. जर तुमच्या लघवीचा रंग जास्त पिवळा असेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला डिहायड्रेशनची किंवा वजायनल इन्फेक्शनची समस्या उद्भवत आहे. याशिवाय किडनीसंबंधी समस्यासुद्धा असू शकतात. जर तुमचे केस खूप गळत आहेत, पांढरे होत आहेत किंवा ते खूप पातळ आहेत, तर तुमचे मानसिक आरोग्य डगमगलेले असू शकते. जर तुम्ही पौष्टिक आहार घेत असाल आणि व्यायाम करत असाल तर सकारात्मक बदल होतात. अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
एनर्जी लेव्हल
एखादी व्यक्ती निरोगी आहे की नाही हे शोधण्यासाठी एखाद्या व्यक्तीची ऊर्जा पातळी एक चांगला मापदंड आहे. जर तुम्ही चांगला आहार घेतला नाही, व्यायाम केला नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो. तर निरोगी व्यक्तीकडे दिवसभराच्या कामासाठी ऊर्जेचा स्तर चांगला असतो आणि तो आपल्या कामात लक्ष केंद्रित करू शकतो. एवढेच नाही तर त्याची काम करण्याची पद्धतही चांगली असते.
फिटनेस लेव्हल
जर तुम्ही निरोगी नसाल तर तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला व्यायाम करताना तुम्ही लवकर थकून जाल. तसेच तुम्ही बराच काळ व्यायाम करू शकणार नाही. परंतु १ तासाच्या व्यायामात थोडा ब्रेक घेऊन, किमान 10 पुशअप्स करण्यास आणि धावण्यास सक्षम असाल तर तुमची फिटनेस लेव्हल चांगली आहे असा याचा अर्थ होतो.
BMI (बॉडी मास इंडेक्स)
जर तुमचा BMI 18.5 ते 24.9 दरम्यान असेल तर ते चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. उंचीच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीचे वजन मोजून BMI निश्चित केले जाते. 18.5 पेक्षा कमी BMI असलेले लोक कमी वजनाचे असतात, तर 25 पेक्षा जास्त आणि 30 पेक्षा कमी BMI असलेले लोक जास्त वजनाचे असू शकतात.
चांगली झोप
जर तुम्हाला अंथरुणावर झोपल्यानंतर 20 मिनिटांच्या आत झोप येत नसेल आणि तुम्हाला 6 तासांपेक्षा कमी किंवा 10 तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तुमची स्लिप सायकल अयोग्य आहे. झोपेचे विकार तुमच्यासाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. तुम्ही ७ तास व्यवस्थित झोप घेत नसाल, सतत झोप मोड होत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
डोळे
निरोगी डोळे हा निरोगी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग तुमच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगतो. तुमच्या पोटाच्या समस्या तुमच्या डोळ्यांवर स्पष्ट दिसतात. तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग स्वच्छ पांढरा असावा. डोळ्यांमध्ये रक्तवाहिन्या दिसू नयेत. तसेच त्यांना कोरडेपणा आणि लालसरपणा नसावा. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर तुम्ही तंदुरुस्त नसाल. पण तुमचे डोळे चमकदार आणि स्पष्ट पांढरे असल्यास तुम्ही निरोगी आणि चांगल्या स्थितीत आहात.
शरीरातून येणारा दुर्गंध
शरीराला दुर्गंधी येणे स्वाभाविक आहे. दिवसभर काम, व्यायाम आणि अनेक कामांमुळे शरीराला वास येतो, पण दुर्गंधी हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंघोळ करून आणि नियमित स्वच्छता पाळल्यानंतरही दुर्गंधी येत असेल तर अत्तर किंवा सुगंधी द्रव्यांच्या मागे धावण्याऐवजी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.