वृषाली जोशी-ढोके
सुंदर चेहेरा कोणाला आवडत नाही? मात्र आपल्या धावपळीचा, चुकीच्या खानपानाचा, स्ट्रेसचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावरही होतोच. तणावग्रस्त आणि ओढलेला चेहेरा असेल तर बरेचदा वयाच्या आधीच प्रौढत्व आल्यासारखे वाटते. अकाली वृद्धत्व आल्याने चेहऱ्यावरचे तेज कमी होते चेहेरा थकलेला दिसतो मग मेकअप करुनही थकलेला चेहेरा लपत नाही. मात्र तुम्हाला सुंदर चेहरा हवा असेल तर रोजच्यारोज फक्त ५ मिनिटं आपल्या चेहऱ्याची काळजी आपणच घ्यायलाच हवी. पार्लरचा खर्च कमी होईल शिवाय चेहरा नैसर्गिकदृष्ट्या सुंदर दिसेल आणि तेजही वाढेल.
त्यासाठी योग्यवेळी जेवण, व्यायाम, मेडिटेशन हे सारं केलं तर उत्तमच. पण ते ही करत नसाल तर किमान फेस योगा करुन पहा. ५ मिनिटं काढा स्वत:साठी..
(Image : google)
फेस योगाचे फायदे..
१. चेहऱ्यावरची अतिरिक्त चर्बी कमी होऊन सौंदर्य वाढते.
२. चेहेरा व डोळे चमकदार आणि तजेलदार दिसतात.
३. डोळ्या खालची काळी वर्तुळं कमी होतात
4. डोळ्याच्या आणि चेहऱ्याच्या मांसपेशी सशक्त होतात.
5. सुरकुत्या कमी होतात.
(Image : google)
त्यासाठी करा व्यायाम
१. डोळ्यांसाठी साधना. डोळे घट्ट बंद करणे मोठे उघडणे. ही प्रक्रिया किमान २० वेळा करायची आहे. यामुळे डोळ्याच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.
२. डोळ्यांची उघडझाप. डोळ्यांची सावकाश उघडझाप करत शक्य होईल तेवढी भराभर उघडझाप करणे आणि पुन्हा सावकाश करत येणे. या प्रक्रियेत डोळ्याला कळ लागल्यासारखे होऊ शकते तेव्हा थांबून पुन्हा उघडझाप करू शकतो.
३. दोन्ही हाताच्या तळव्यांनी दोन्ही डोळ्यावर अगदी सावकाश दाब देणे. यामुळे डोळ्याचे प्रेशर योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.
४. तोंडात भरपूर हवा भरून गाल फुगवून ठेवणे. ही अवस्था १५ ते ३० सेकंद ठेवून तोंडातील हवा बाहेर काढून टाकणे. साधारण दहा वेळा ही प्रक्रिया करायची आहे त्यामुळे गालावरची चरबी कमी होऊन चेहेरा तजेलदार दिसतो.
५. पाऊट ( चंबू ) करणे आणि स्माईल करणे. ही प्रक्रिया सलग करायची आहे. यामुळे ओठांचे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरचा ताण कमी होतो.
६. तोंडात हवा भरून घ्यायची आणि गुळणी करतो त्याप्रमाणे गालांची हालचाल करणे. ही हालचाल साधारण १० ते १५ वेळा करता येते. याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास सहज मदत होते.
या सहज सोप्या हालचाली आणि सुक्ष्म योग प्रकारांनी चेहेरा हसरा आणि आकर्षक बनवू शकतो.
(लेखिका आयुषमान्य योग आणि वेलनेस ट्रेनर आहेत.)