Join us  

खूप ‌थंडी वाजते, थंडी सहनच होत नाही? करा फक्त २ योगासनं, थंडीतही राहा फिट आणि वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 5:44 PM

Yoga Sana Winter Special काही लोकांना गरम कपडे घालून देखील थंडी वाजते. त्यासाठीच ही दोन योगासनं करा.

हिवाळा आला. थंडी वाजतेच, पण कुणाला कमी थंडी वाजते कुणाला जास्त. काहींना त्वचेच्या समस्या जाणवतात.  थंडीपासून बचावासाठी अनेक जण स्वेटर परिधान करतात. मात्र, तरी काहीजणांना खूपच थंडी वाजते.  यावर एकच उपाय ते म्हणजे योग. योगासना शरीराला आतून आणि बाहेरून मजबूत बनवते. या हिवाळ्यात पांघरून घेऊन झोपत असाल, तर तसं न करता सकाळी लवकर उठून योगासनं करा. हिवाळ्यातील आजारांपासून आराम तर मिळेलच यासह शरीरात उष्णता देखील निर्माण होईल.

अग्निसार योग

अग्निसार हा प्राणायामचा एक प्रकार आहे. हा प्राणायाम नियमित केल्याने नाभीच्या भागावर सर्वाधिक परिणाम होतो. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि विविध रोगांपासून आपला बचाव होतो. यामुळे पोटाची चरबी कमी होते. या साठी उभे राहून दोन्ही पायामध्ये अर्ध्या फुटाचे अंतर ठेवावे. आत शरीराच्या वरच्या भागाला ६० अंश पर्यत वाकवा. दीर्घ लांब श्वास भरून पोटाला पुढे मागे करा. सुरुवातीला १०-१५ वेळा हे प्राणायाम करा. हा योग नियमित केल्याने पोटाच्या हालचालींमध्ये वाढ होईल. यासह आतून उष्णता वाढेल.

कपालभाती

कपालभातीला हठयोगींचा योग/प्राणायाम म्हटले जाते. कपालभाती कोणत्याही आसनात बसून करता येते. या आसनाच्या सरावाने हिमालयात राहणारे योगी शरीरातील वात आणि पित्त यांचे संतुलन साधत असत. या प्राणायामामुळे त्यांचे शरीर गरम होण्यासही मदत झाली आहे. दोन्ही पायांना आराम मिळेल अशा स्थितीत बसावे. एक लांब श्वास घेवून श्वास सोडावा, श्वास घेण्यावर महत्व न देता श्वास सोडण्यावर ध्यान केंद्रित करावे. श्वास घेतांना पोटातील आतडी फुगली पाहिजे व श्वास सोडतांना आतडी संकुचीत झाली पाहीजे. हा योग एकावेळी १० ते १५ वेळा नक्कीच करावा.

टॅग्स :योगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्स