महिला आणि व्यायाम हे समीकरण अनेक ठिकाणी जुळता जुळत नाही. म्हणूनच तर नियमितपणे व्यायाम करणाऱ्या महिलांची संख्या आपल्याकडे अजूनही कमीच आहे. कारण खूप इच्छा असूनही अनेकींना वेळेअभावी व्यायाम करणं शक्य नसतं. कधी डब्याची घाई तर कधी स्वत:च्या ऑफिसची कामे, कधी पाहुण्यांची वर्दळ तर कधी सणवार आणि समारंभ. कधी मुले आजारी पडतात, तर कधी स्वत:चे दुखणेखुपणे. कोणत्या ना कोणत्या कारणाने महिलांच्या व्यायाम करण्याला ब्रेक लागतोच. हा ब्रेक कधीकधी खूपच मोठा होतो. मग या ब्रेकला 'ब्रेक' लावण्यासाठी कधीतरी व्यायामाची सुरूवात होते. पण मोठ्या ब्रेकनंतर व्यायामाला सुरूवात करताना अतिउत्साहात काही गोष्टी केल्या, तर पुन्हा एकदा व्यायामात खंड पडू शकतो. म्हणूनच खूप दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा व्यायाम करायला सज्ज झाला असाल, तर या गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे.
१. हलक्या फुलक्या व्यायामाने सुरूवात कराखूप दिवसांनी व्यायाम करणार असाल तर सुरूवातीला अगदीच वार्मअप एक्सरसाईज, स्ट्रेचिंग असा व्यायाम करण्यावर भर द्या. कारण तुमच्या शरीराची व्यायामाची सवय सुटलेली असते. अशावेळी जर खूप हेवी एक्सरसाईज केली तर स्नायुंना त्रास होऊ शकतो आणि पुन्हा एकदा व्यायामात खंड पडू शकतो. त्यामुळे सुरूवातीला जरा सावकाश व्यायाम करण्यावर भर द्या.
२. योगासनांपासून सुरूवात कराखूप दिवसांनी व्यायाम करणार असाल तर तुमचे शरीर हेवी एक्सरसाईजला तयार होण्यासाठी योगासने खूप उपयुक्त ठरतात. योगासनांमुळे शरीर पुन्हा फ्लोमध्ये येऊ लागतं. शरीराची लवचिकता वाढू लागते. त्यामुळे सुरूवातीला सोप्या योगासनांनी सुरूवात करा. आठवडाभर फक्त योगासनेच केली तरी चालतील. यामुळे निश्चितच तुमच्या शरीराची आणि मनाचीदेखील नियमितपणे व्यायाम करण्याची तयारी होते, असे तज्ज्ञ सांगतात.
३. केवळ काही मिनिटांचा व्यायाम कराखूप दिवसांनी व्यायाम करणार असाल, तर काही दिवस केवळ ३० मिनिटांसाठी व्यायाम करा. याचे कारण म्हणजे शरीराला खूप जास्त व्यायाम करण्याची सवय नसते. त्यामुळे लगेचच थकवा येऊ शकतो. व्यायाम करून जर थकवा येत असेल, तर व्यायाम करण्याची अजिबातच इच्छा होत नाही. म्हणून असे होऊन पुन्हा व्यायामात गॅप येऊ नये, यासाठी सुरूवातीला अगदी मोजकाच वेळ व्यायाम करा आणि त्यानंतर वेळ वाढवत न्या.
४. योग्य वेळ निवडाव्यायामाची कोणती वेळ निवडावी हा सगळ्यात मुख्य प्रश्न. त्यामुळे आपल्याला जी वेळ खरोखरीच सोयीची वाटत असेल, अशाच वेळी व्यायाम करायला हवा. काही जणं सकाळी लवकर व्यायामाला जाऊ असे ठरवतात. पण नेमका उठायला उशीर होत जातो आणि व्यायामात खंड पडतो. त्यामुळे इतरांच्या सांगण्यावरून किंवा इतर लोक केव्हा व्यायाम करतात, ते पाहून स्वत:ची वेळ ठरवू नका. जी वेळ आपल्याला साेयिस्कर असेल तिच वेळ व्यायामासाठी निश्चित करावी.