Join us  

फिट अँड फाईन सुजैन खानचे भन्नाट फिटनेस गोल्स; तिचा व्हिडिओ सांगतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2022 11:51 AM

Weight loss tips : वाचा या व्यायामप्रकाराचे एकाहून एक भन्नाट फायदे...

ठळक मुद्देबॉक्स जंपमुळे पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. तसेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा उत्तम व्यायामप्रकार आहे इन्क्लाकईन पुश-अप खांद्यावर आणि मनगटावर दबाव आणतात आणि छातीच्या स्नायूंवर अधिक जोर देतात. त्याची शरीर टोन व्हायला मदत होते. 

सुजैन खान (Sussanne Khan) तिच्या फिटनेसबाबतच्या गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही फिटनेसशी  (Fitness) निगडित काही ना काही पोस्ट नेहमी दिसतात. ती सतत काही ना काही वेगळे व्यायामप्रकार (Excersises) करुन स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. दोन मुलांची आई असलेल्या सुजैनचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे. तिच्या फिट अँड फाईन असण्याचे रहस्य तिच्या चाहत्यांना माहित असून त्यासाठी ती करत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचे कौतुकही होताना दिसते. पेशाने इंटेरियर डिझायनर असलेली सुजैन गेल्याच महिन्यात कोव्हीड पॉझिटीव्ह होती. या आजारामुळे गेलेली ताकद भरुन येण्यासाठी सुजैन पुन्हा नव्या जोमाने व्यायामाला लागली असल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे. 

नुकताच तिने इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती बॉक्स जंप (Box jump) प्रकारचा व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवारी आपला हा व्हिडिओ पोस्ट करत सुजैनने आपल्या चाहत्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन दिले आहे. जवळपास गुडघ्याच्या उंचीच्या एका बॉक्सवर सुजैन अगदी सहज उड्या मारताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दिसायला हा व्यायामप्रकार सोपा वाटत असला तरी त्यासाठी बरीच ताकद लागते. इतकेच नाही तर तुमचे बॅलन्सिंगही चांगले असणे गरजेचे असते. पायाच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तसेच हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हा व्यायामप्रकार अतिशय उपयुक्त असतो. पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही या बॉक्स जंपचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

यामध्ये तिने जीमसाठी वापरण्यात येणारे मस्त ट्रेंडी असे कपडे घातले असून केसांचे दोन पोनी टेल बांधले आहेत. तिचे पाळीव कुत्रे व्यायाम करताना तिला सोबत देत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुजैनचे वय ४२ असून याआधीही तिने वेट ट्रेनिंग किंवा अन्य व्यायाम करतानाचे आपले व्हिडिओ सोशल मडियावर पोस्ट केले आहेत. याआधीही तिने अशाप्रकारे बॉक्स जंप करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी काही प्रेरणा शोधत असाल तर सुजैनचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरु शकतो. 

बॉक्स जंपिंगचे फायदे (Benefits of box jumping)

१. बॉक्स जंपमुळे पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते 

२. या वर्कआउट्समुळे तुमच्या हृदयाची धडधड वाढते आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.

३. कॅलरीज बर्न करण्यासाठीही हा व्यायाम अतिशय उत्तम आहे. 

४. पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी या व्यायामाचा चांगला उपयोग होतो 

५. इन्क्लाकईन पुश-अप खांद्यावर आणि मनगटावर दबाव आणतात आणि छातीच्या स्नायूंवर अधिक जोर देतात. त्याची शरीर टोन व्हायला मदत होते. 

 ६. बॉक्स स्टेप-अप एक प्रभावी व्यायाम आहे जे संतुलन आणि समन्वय सुधारते. 

टॅग्स :फिटनेस टिप्ससुजैन खान