फिटनेस फ्रिक (Fitness freak) करीना कपूर तिच्या फिटनेसला, डाएटला आणि रेग्यूलर वर्कआऊटला किती महत्त्व देते, हे तर आपल्याला माहितीच आहे. करिना सहजासहजी तिचं वर्कआऊट (workout)चुकवत नाही. यातही जीममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम करण्यावर तिचा अधिकाधिक भर असतो.. आता हेच बघा ना... करीनाने नुकताच एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram)शेअर केला आहे. यामध्ये ती सुर्यनमस्कार करताना दिसते आहे.
मागे काही महिन्यांपूर्वीही करिनाने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. यामध्ये तिने स्वत:चा एक सेल्फी शेअर केला होता. सेल्फीमध्ये तिची त्वचा अतिशय चमकदार दिसत होती आणि त्वचेवरची ही चमक १०८ सुर्यनमस्कार घातल्यामुळे आली आहे, असं करिनाने त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा करिनाने तिचा सुर्यनमस्कार करतानाचा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तिने चक्क १०८ सुर्यनमस्कार (108 suryanamaskar)घातले आहेत. १०८ सुर्यनमस्कार हा करीनाचा सगळ्यात आवडता व्यायाम प्रकार आहे, असं दिसतं. कारण ठराविक दिवसांचा काळ गेल्यावर करीना १०८ सुर्यनमस्कार घालते आणि तिच्या चाहत्यांना फिटनेस संदर्भात मोटीव्हेट करते.
एका दमात १०८ सुर्यनमस्कार घालणं ही अजिबातच हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड स्टॅमिना लागतो. अर्थातच ती नियमितपणे व्यायाम करते, त्यामुळे एका दिवसात ठराविक वेळेत १०८ सुर्यनमस्कार घालणे तिला शक्य झाले. १०८ सुर्यनमस्कार घालणे, हे एक मोठे आव्हान असून जबरदस्त इच्छाशक्ती, संयम आणि दररोज व्यायाम करण्याची सवय असेल, तरच हे जमू शकते. आता एका दिवसात १०८ सुर्यनमस्कार घालणे शक्य नसले तरी दररोज १० सुर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. शिवाय सुर्यनमस्कार घालण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. घरातल्या घरात अगदी सहज जमणारा हा व्यायाम करून बघायला काय हरकत आहे..
सुर्यनमस्कार घालण्याचे फायदे..
Benrfits of suryanamaskar
- सुर्यनमस्कार हा एक परिपुर्ण व्यायाम असून सुर्यनमस्कार घातल्यावर इतर कोणताही व्यायाम करण्याची गरज पडत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
- सुर्यनमस्कार हा सर्वांगिण व्यायाम असून सुर्योदयाची वेळ सुर्यनमस्कार घालण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.
- सुर्यनमस्कार नेहमी मोकळ्या हवेत आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात घालावेत.
- नियमितपणे सुर्य नमस्कार घातल्यास अंगावरची अतिरिक्त चरबी कमी होते.
- शरीर सुडौल आणि लवचिक होण्यास सुर्यनमस्कार उपयोगी ठरतात.
- सुर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. संपूर्ण शरीरातच चांगला रक्तप्रवाह होऊ लागल्याने त्वचा तजेलदार होते.
- स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी सुर्यनमस्कार हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.
- सुर्यनमस्कार घातल्याने श्वसन क्रिया सुधारते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात.
- लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाब यासारख्या आजारांसाठी सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात