Join us  

वाढलेल्या वजनाचं टेन्शन आलेय? फिटनेस एक्सपर्ट सांगतात 5 व्यायाम, वेटलॉसचा वेग वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 2:19 PM

अति प्रमाणात कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढतं. हे वजन कमी करायचं असल्यास जेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरात जातात त्या बर्न होणंही तितकंच गरजेचं आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगानं कॅलरीज बर्न करणारे व्यायाम करणं आवश्यक असल्याचं फिटनेस तज्ज्ञ म्हणतात.

ठळक मुद्दे रोज एक तास सायकलिंग केल्यानं कमीत कमी 483 कॅलरीज बर्न होतात.चालताना जर हातात वजन असलं तर या चालण्याच्या व्यायामानं कॅलरीज वेगानं बर्न होतात.दोरीवरच्या उड्या मारल्यास फिटही राहाता येतं आणि वजनही कमी होतं.

 डोक्यात वजन कमी करण्याचा विचार असला तरी आवडीचे खाण्याचे पदार्थ असले की हा विचार बाजूला पडतो. पण प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने शरीरात कॅलरीज मात्र वाढत जातात. या कॅलरीज जर बर्न झाल्या नाहीत तर वजन मात्र वाढतं. हे वजन वाढल्यानं फिटनेसचा प्रश्न निर्माण होतो तसंच इतर आजारांचाही धोका वाढतो. तज्ज्ञ सांगतात प्रौढ पुरुषांना दिवसभरात 2500 कॅलरीज आणि महिलांसाठी 2000 कॅलरीजची गरज असते. पण सध्या आपलं सगळ्यांचं खाणं पिणं चव, आवड यावर केंद्रित झालेलं असल्यानं प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त कॅलरीज शरीरात जातात.

छायाचित्र- गुगल

वजन कमी करण्यासाठी या कॅलरीज बर्न करणं अत्यंत आवश्यक आहे. अति प्रमाणात कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढतं. हे वजन कमी करायचं असल्यास जेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरात जातात त्या बर्न होणंही तितकंच गरजेचं आहे. फिटनेस तज्ज्ञ म्हणतात आठवड्याभरात जर एक किलो वजन कमी करायचं असेल तर आपल्याला रोज 500 ते 1000 कॅलरीज बर्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्या रोजच्या हालचालीतून अर्थातच एवढ्या कॅलरीज बर्न करणं केवळ अशक्यच. व्यायामाने कॅलरीज बर्न होतात. पण एका दिवसात 500 ते 1000 कॅलरीज बर्न करण्यासाठी सामान्य प्रकारचा व्यायाम उपयोगी ठरत नाही. त्यासाठी फिटनेस तज्ज्ञ वेगाने कॅलरीज बर्न करणारे व्यायाम सुचवतात.

वेगाने कॅलरीज बर्न करणारे व्यायाम प्रकार

छायाचित्र- गुगल

1. सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम आहे. रोज एक तास सायकलिंग केल्यानं कमीत कमी 483 कॅलरीज बर्न होतात. सायकलिंगद्वारे कॅलरीज बर्न करण्यासाठी किती वेळ सायकल चालवतो हे तर महत्त्वाचं आहेच पण किती वेगानं किती दूरपर्यंत सायकल चालवतो यालाही महत्त्व आहे. सायकलिंगद्वारे वजन घटवण्याचा विचार असेल तर फिटनेसतज्ज्ञांकडून सायकलिंगची योग्य पध्दत समजून घ्यावी.

छायाचित्र- गुगल

2. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर्स, फिटनेस तज्ज्ञ नेहेमी लिफ्टचा वापर टाळून पायर्‍या चढायच्या उतरायच्या सल्ला देतात. पायर्‍या चढण्या उतरण्यानं चांगला व्यायाम होतो. व्यायाम म्हणून सलग एक तास पायर्‍या चढल्या उतरल्या तर एका तासात जवळ जवळ 850 कॅलरीज बर्न होतात.

छायाचित्र- गुगल

3. नियमित चालणं हा शरीरासाठी अतिशय फायदेशीर व्यायाम मानला जातो.पण चालताना जर हातात वजन असलं तर या चालण्याच्या व्यायामानं कॅलरीज वेगानं बर्न होतात. चालताना हातात साडे चार किलो वजन घेऊन चालल्यास आपल्या शरीरातल्या 415 कॅलरीज बर्न होतात.

छायाचित्र- गुगल

4. वजन कमी करण्यासाठी पोहोण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. वेगानं कॅलरीज बर्न करण्यासाठी पोहोताना ब्रेस्टस्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय या तंत्रांचा उपयोग करावा असं तज्ज्ञ सांगतात. या पध्दतीने पोहोल्यास शरीरातील 500 ते 700 कॅलरीज सहज बर्न होतात.

छायाचित्र- गुगल

5. लहानपणी दोरीवरच्या उड्या या खेळ म्हणून मारल्या जायच्या. पण प्रौढ झालं तरी या दोरीवरच्या उड्या आपल्या आयुष्यातून वजा करुन चालणार नाही. उलट आता हा नुसता खेळ राहिला नसून तो एक व्यायाम झाला आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगानं कॅलरीज बर्न होणं आवश्यक आहे. यासाठी दोरीवरच्या उड्या मारल्यास फिटही राहाता येतं आणि वजनही कमी होतं. दोरीवरच्या उड्या मारल्यानं स्नायू मजबूत होतात. शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. जर रोज कमाल अर्धा तास आणि किमान पंधरा मिनिटं दोरीवरच्या उड्या मारल्या तर 650 कॅलरीज बर्न होतात.