साधारणपणे बाळांतपण झालं की प्रत्येक महिलेला बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी वाढण्याची समस्या भेडसावू लागते. सुरूवातीला ओटीपोट थोडं वाढत आहे, असं आपल्याला जाणवतं. पण बहुतांश जणी शरीर देऊ पाहत असलेली ही सूचना दुर्लक्षित करतात. इथेच नेमका घोळ होतो. एकदा का या समस्येकडे दुर्लक्ष केलं की मग पोटावर एक, दोन, तीन असे टायर कसे वाढत जातात, हे देखील आपल्याला समजत नाही.
मग प्रत्येक ड्रेस घालताना, इतकंच काय तर अगदी साडी नेसतानाही पोट कसं आणि कुठून झाकावं याची अडचण होते. कंबर आणि पोट हा सगळा भागच अतिशय बेढब होऊन जातो. याचा अनेकींना खूप जास्त मानसिक त्रासही होतो आणि अचानकच आपलं वय वाढलंय का, आपण बेढब झालोय का, असे प्रश्न छळू लागतात. म्हणूनच वेळीच सावध व्हा. पोटाचा घेर कमी होण्याआधीच खाण्या- पिण्याचे, व्यायामाचे काही नियम पाळा. केवळ बेढबपणा कमी करायचाय म्हणून नाही, तर सुटलेल्या पोटामुळे पाठ- कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी किंवा इतर अनेक शारीरिक समस्या जाणवू नयेत, म्हणून पोटावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी....१. कॅलरीजचा नियम पाळाकॅलरीज खूप जास्त पोटात जात असतील आणि त्या तूलनेत कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण खूपच कमी असेल तर पोटावरची चरबी वाढत जाते. त्यामुळे सुरूवातीला काही दिवस कॅलरीजचा इनटेक आणि कॅलरी बर्न किती होत आहे, हे काटेकाेरपणे तपासा. आपल्याला जर योग्य प्रमाणात कॅलरीज बर्न करणे जमत नसेल, तर कॅलरीचा इनटेक कमी करा. प्रकृती, कामाची पद्धत, दैनंदिन श्रम यानुसार प्रत्येकाची कॅलरीजची गरज वेगवेगळी आहे. पण सर्वसाधारणपणे दररोज १२०० कॅलरीज घेतल्या पाहिजेत आणि ५०० कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
२. फायबर आणि प्रोटिन्सचे सेवन वाढवाजर दररोज योग्य प्रमाणात फायबरयुक्त पदार्थ खाल्ले गेले तर शरीराची चयापचय क्रिया सुधारते. शरीरात मेद, चरबी साचून राहण्याचे प्रमाण घटते. तसेच फायबरयुक्त पदार्थांमुळे पोट लगेचच भरल्यासारखे वाटते. त्यामुळे साहजिकच आहार कमी प्रमाणात घेतला जातो. तसेच प्रोटीन्सचे सेवन योग्य प्रमाणात असेल तर शरीरातील उर्जा टिकून राहते. त्यामुळे कॉर्न, राजमा, अव्हॅकॅडो, मटार, ओट्स, गाजर, केळी, ब्लॅकबेरी, पेर, बदाम, सफरचंद, ब्रोकोली हे पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले पाहिजेत.
३. व्यायामावर भर द्यापोटावरची चरबी कमी करण्यासाठी केवळ कार्डियो एक्सरसाईज करून उपयोग नाही. यासाठी तुम्ही हेवी वेटलॉस वर्कआऊट केलं पाहिजे. सुर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, प्लँक, क्रंचेस, बर्पीज हे व्यायाम प्रकार पोटावरची चरबर कमी करण्यासाठी फायद्याचे ठरतात. तसेच कपालभाती प्राणायामनेही पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.