Join us  

स्लीम तर व्हायचंय पण ताकदही हवी, मग मंदिरा बेदी सांगतेय ते हे व्यायाम करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 3:04 PM

सुडौल दिसण्यासोबतच शरीराची ताकदही कमवायची असेल आणि बांधा आकर्षक करायचा असेल तर अभिनेत्री मंदिरा बेदी म्हणते तसं स्क्वॉटस करायला पर्याय नाही. स्क्वॉटस हे पुरुषांइतकेच महिलांसाठीही महत्त्वाचे असतात.

ठळक मुद्दे स्क्वॉटस हे अनेक प्रकारचे असतात. साधारणपणे सात प्रकारचे स्क्वॉटस केले जातात. तज्ज्ञ सांगतात की हे सात प्रकारचे स्क्वॉटस शिकून ते करायला हवेत.खरंतर कोणताही व्यायाम करताना तो तंत्रशुध्दच करायला हवा. स्क्वॉटस करताना हा नियम काटेकोरपणे पाळायला हवा. स्क्वॉटस करताना पध्दत चुकली तर त्याचा थेट परिणाम मणक्यावर होतो.स्नायू बळकट करण्यासाठी, शरीराला बांघेसूदपणा आणण्यासाठी , शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी स्क्वॉटस महत्त्वाचे असतात.

रोज सकाळी उठून व्यायाम करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मनाचा निर्धार लागतो. त्यात जर कोणाकडून प्रेरणा मिळाली, मार्गदर्शन मिळालं तर व्यायाम करायला आतून प्रेरणा मिळते. सामान्य माणसं अनेकदा स्टार्सकडे फिटनेससाठी आदर्श म्हणून बघतात. त्यांच्या आखीव रेखीव बांध्याकडे बघून हे त्यांना कसं जमतं हे शोधण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी मर्यादित माध्यमांच्या काळात अभिनेत्रींची फिगर म्हणजे काहीतरी कॅमरा ट्रीक असेल असं वाटायचं पण आता माध्यमांच्या सुकाळ असणाऱ्या काळात या अभिनेत्रींचा बांधा खरोखरच सुडौल असतो हे कळत गेलं. आणि त्यासाठी त्या रोज अनेक तास घाम गाळत असल्याचं सत्यही समोर आलं.  नुकताच अभिनेत्री आणि अनेकींची फिटनेस आयडॉल असलेल्या मंदिरा बेदीनं आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती मांडीचे, पायाचे, दंडाचे स्नायू बळकट करणं हे महिलांसाठी पुरुषांइतकंच महत्त्वाचं असल्याचं म्हणते. इतकंच नाही तर वजन कमी करण्यासाठी, मांड्या आणि ओटीपोटावरची चरबी कमी करण्यासाठी स्क्वॉटस करण्याचं आवाहन ती करते. हा डीप स्क्वॉटस करतानाचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

प्रत्येक व्यायाम प्रकाराचे वैशिष्ट्यपूर्ण असे फायदे असतात. काही व्यायाम प्रकार हे विशिष्ट अवयवांना लक्ष्य करुन केले जातात. तसाच हा स्क्वॉटस हा प्रकार पाठीचा मणका, ओटीपोटाचे स्नायू, मांड्या, पोटरीचे स्नायू आणि दंड या अवयवांसाठी महत्त्वाचा असतो. स्क्वॉटस हे अनेक प्रकारचे असतात. साधारणपणे सात प्रकारचे स्क्वॉटस केले जातात. तज्ज्ञ सांगतात की, हे सात प्रकारचे स्क्वॉटस शिकून ते करायला हवेत. स्क्वॉटसच्या व्यायामानं फायदा मिळवून घ्यायचा असेल तर रोज वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वॉटस करता यायला हवेत. रोज एकाच प्रकारचे स्क्वॉटस करु नये असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  सोप्या स्क्वॉटसच्या प्रकारांनी सुरुवात करावी. आणि मग थोडे थोडे अवघड अवघड स्क्वॉटस करावेत. प्राथमिक प्रकारचा स्क्वॉटस करताना तो शरीराच्या वजनाच्या सहाय्यानं केला तरी चालतो. मंदीरा बेदीनं डीप स्क्वॉटसचा जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तिने हातात मेडिसिन बॉल घेऊन  व्यायाम केला आहे.

पध्दत चुकायला नकोखरंतर कोणताही व्यायाम करताना तो तंत्रशुध्दच करायला हवा. स्क्वॉटस करताना हा नियम काटेकोरपणे पाळायला हवा. स्क्वॉटस करताना पध्दत चुकली तर त्याचा थेट परिणाम मणक्यावर होतो. चुकीच्या पध्दतीनम व्यायाम केल्यास अवयवांना किंवा स्नायुंना, नसांना दुखापत होण्याची शक्यता असते. हे स्क्वॉटस घरच्याघरी करता येतात हे खरं असलं तरी ते आधी तज्ज्ञांच्या मार्फत शिकून घ्यायला हवेत. तज्ज्ञ सांगतात की स्क्वॉटस करताना पोट रिकामंच असायला हवं. खाऊन लगेच स्क्वॉटस करु नये. जर काही खाल्लं असेल तर मग दोन तासांनी स्क्वॉटस करावेत. स्क्वॉटस करतान एकदम खाली बसू नये. शरीर हळूहळू गुडघ्यात वाकवून ते गुडघ्यांच्याही अगदी खाली जमिनीशी संमातर ठेवायचं असतं. हा व्यायाम करताना खाली बसताना श्वास आत घ्यावा आणि उठताना श्वास बाहेर  सोडावा. शरीराचं वजन हे टाचेवर यायला हवं याची काळजी घ्यायला हवी. स्क्वॉटस करताना पाठ ताठ हवी. ती पुढे झुकलेली नसावी. दोन पायात थोडं अंतर ठेवून आणि पायाचे पंजे थोडे बाहेरच्या बाजूस काढून हा व्यायाम करायचा असतो.

कसे करायचे स्क्वॉटस? दोन पायात थोडं अंतर ठेवून ताठ उभं राहावं. दोन्ही पायाचे पंजे बाहेरच्या बाजूस काढावेत. आणि हात छातीच्या समोर ताठ ठेवावेत. आणि मग खुर्चीत बसतो तसं किंवा तशी पोज घेत खाली बसावं. शरीर हे गुडघ्याच्या खाली गेलेलं असावं. नितंबं जमिनीला टेकू देऊ नये. ते समांतर असावे. या अवस्थेत काही सेकंद राहावं आणि मग श्वास सोडत वर उठावं. १२ स्क्वॉटसचा एक सेट असतो. असे तीन सेट करावेत. प्रत्येक सेटच्या दरम्यान एक मिनिटांचा विश्राम असावा.

स्क्वॉटसचे फायदे काय?

स्क्वॉटस करताना मांड्यांमुळे ओटीपोटावर दाब पडतो. ज्याचा परिणाम ओटी पोट कमी होण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास होतो.

या व्यायाम प्रकारात पोट आणि पाठीच्या मांसपेशीचा, मणक्याचा, तसेच पोटऱ्यांचे स्नायू, दंड . पायाचा घोटा, टाच या सर्व अवयवांचा समावेश असल्यानं स्क्वॉटस घातल्यानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीर समतोलित होतं.

अनेक महिलांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असतो. नियमित स्क्वॉटस केल्यानं या समस्या दूर होतात.

स्क्वॉटस केल्यानं बसण्याची पद्धत सुधारते.

नितंब, मांड्या आणि ओटीपोटावर साठलेली चरबी कमी होते.

 शरीर लवचिक होतं.

 स्क्वॉटस करताना जे स्ट्रेचिंग होतं त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

स्क्वॉटस करताना स्नायुंवर ताण पडतो. त्यामुळे स्नायुंची क्षमता वाढते. परिणामी शरीराची ताकद वाढते.

टॅग्स :मंदिरा बेदीफिटनेस टिप्स