मनाली बागुल
सध्याच्या बिझी जीवनशैलीत मेंटेन राहणं खूप कठीण झालंय. कामाचे तास, खाण्यापिण्यातील अनियमिता, झोप पूर्ण न होणं यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढत जाते. वजन वाढल्याचं जाणवताच पोटाचा, कंबरेचा घेर कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. घरगुती उपाय, योगा, जीम डाएट इत्यादींचा आधार घेतला जातो. पण अनेकदा इतकं सगळं करूनही झटपट बदल शरीरात दिसत नाही. ( 5 Common Fitness Myths to Avoid)
वजन कमी करण्यासाठी काहीजण जीमचा मार्ग निवडतात पण काही गैरसमज डोक्यात असल्यानं त्यांना रिझल्ट्स मिळणं कठीण होतं. जिमला गेल्यानंतर लगेच बारीक दिसायला लागू, जास्त घाम गाळल्यानं लवकर वजन कमी होईल...असा काहींचा समज असतो. मास्टर ट्रेनर राहूल चौधरी (न्युट्रिशनिस्ट, आर, सी फिटनेस, संचालक) यांनी लोकमत सखीशी बोलताना जीम, वर्कआऊट आणि वजन कमी करण्याबद्दलचे समज, गैरसमज याबाबत सखोल माहिती दिली.
१) जास्त वजन उचलल्यानं मसल्स गेन होतात?
मास्टर ट्रेनर राहूल सांगतात, महिलांच्या तुलनेत पुरुषांचे मसल्स गेन लवकर होतात. पण ते ही जेनेटिक्स आणि बॉडी टाईप यावर अवलंबून असते. Endomorphs, mesomorph, ectomorph हे तीन बॉडी टाईप्स आहेत. यात बदल करण्यासाठी प्रामुख्यानं डाएट आणि बीएमआरकडे अधिक लक्ष द्यावे लागते. मसल्स गेनसाठी फक्त व्यायाम नाही तर न्युट्रिशन, डाएटही गरजेचे असते. महिलांमध्ये उद्भवणारी पीसीओडी, पीसीओएसची समस्या कमी करण्यासाठी अनेकदा हेवी वेट लिफ्टींग आणि हेल्दी फॅट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हार्मोनल संतुलन योग्य राहण्यास मदत होते.
२) वर्कआऊट बंद केल्यानं अचानक वजन वाढतं, जर वाढत असेल तर त्याची कारणं काय?
हो, वर्कआऊट बंद केल्यानं वजन वाढू शकतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब केला, किती वेळ लागला हे खूप महत्वाचं असतं. जीमला जाणं बंद केल्यानंतर तुम्ही हेल्दी पदार्थ म्हणजेच घरात तयार होणारे अन्न व्यवस्थित, नियमित घेतले नाही तर याचा परिणाम शरीरावर दिसू शकतो.
जीम सोडल्यानंतर डाएट का करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. लोक असे पदार्थ खाण्याकडे लक्ष देत नाहीत. जीम सोडल्यानंतर मसल्स ब्रेकडाऊन होत नाही. त्यानंतर तुम्ही जे काही खाता त्याचे फॅट्स, ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. परिणामी वजन वाढल्याचं जाणवतं.
३) ट्रेनरची निवड करताना काय लक्षात घ्यायला हवं. फिटनेस ॲप्लीकेशनवर कितपत विश्वास ठेवावा?
तुम्ही ॲप्लीकेशन्सच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट करत असाल किंवा जीमला जात असाल, ट्रेनर सर्टिफाईड आहे की नाही हे पाहणं महत्वाचं असतं. ऑनलाईन ट्रेनिंग घेत असताना अनेक मर्यादा येतात. याउलट ट्रेनर वर्कआऊट करताना समोर असेल तर जास्त फायदा होऊ शकतो. यामुळे व्यायामाची योग्य पद्धत समजण्यास मदत होते.
४) महिलांचे लव्ह हँण्डल कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात, ते कितपत योग्य?
तुमच्या हाडांची रचना कधीही बदलत नाही. स्पॉट रिडक्शन असं काहीच नसतं. तुम्ही फक्त एब्स किंवा साईड कल्स करत असाल आणि कॅलरी बर्न, डाएटकडे लक्ष नसेल तर उपयोग होऊ शकत नाही. ओव्हरऑल फॅटलॉस करताना बॉडी पार्ट्स ट्रेन होतात. बेसिक फॅट लॉसचं लॉजिक असं की, आपल्या संपूर्ण शरीरात मसल्स असतात. ज्यावेळी तुम्ही ते मसल्स ट्रेन करता तेव्हा मसल्स ब्रेकडाऊन होऊन इंधनासाठी शरीरातलं फॅट, एक्स्ट्रा ग्लायकोजन वापरलं जातं. त्यामुळे फॅट लॉस होऊन बॉडी पार्ट्स योग्य आकारात दिसतात. पण त्यासाठी डाएट, व्यायामात सातत्य असणं फार महत्वाचं असतं.
५) व्यायामाच्या सुरूवातीला वॉर्मअप आणि शेवटी स्ट्रेचिंग का गरजेचं?
बहुतांश लोक जीमला येताना कार किंवा बाईकनं येतात. ऑफिसमध्ये तासनतास बसून काम यामुळे फिजिकल एक्टिव्हीटी कमी होते. यामुळे जॉईंन्ट्सची मोबिलिटी कमी होते. वॉर्मअपमुळे जॉईन्ट्समधील synovial fluid एक्टिव्ह होते. यामुळे व्यायामादरम्यान जॉईन्ट्सचे त्रास कमी होतात. याउलट व्यायामानंतर स्ट्रेचिंग केली नाही तर तुम्हाला बॉडी पेन तीव्रतेनं होण्याची शक्यता असते. स्ट्रेचिंग यामुळे मसल्स ग्रोथ होण्यास मदत होते म्हणून व्यायामानंतर स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो.