Join us  

Fitness Tips : रोज करा फक्त ३ व्यायाम, वजन तर कमी होईलच, जाडजूड झालेले पायही होतील सुडौल- सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 5:43 PM

Fitness Tips : घरच्या घरी काही सोपे आणि अगदी कमी वेळात होणारे व्यायामप्रकार केले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो.

ठळक मुद्देभिंतीचा आधार घ्यायचा असल्याने ज्यांना बॅलन्स करता येत नाही त्यांच्यासाठी हे तिन्ही व्यायामप्रकार उपयुक्त ठरतात. कमीत कमी वेळात कोणत्याही साधनाशिवाय होणारे हे व्यायामप्रकार नक्की करुन पाहा

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण सतत काही ना काही प्रयत्न करत असतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असं नाही. मग आपण जाड असल्याची सल आपल्या मनात राहते आणि कालांतराने आपला आत्मविश्वास कमी होण्याचीही शक्यता असते. अगदी फिगरमध्ये नाही पण किमान खूप जाड असू नये असं आपल्याला मनापासून वाटत असतं. चुकीचा आहार, कामाचा ताण, झोपेच्या वेळा आणि व्यायामाचा अभाव यांमुळे वजन एकदा वाढायला लागले की कमी व्हायचे नाव घेत नाही (Fitness Tips). 

घरातली कामं, ऑफीसची कामं आणि इतर गोष्टींमुळे आपले रुटीन इतके पॅक होऊन गेलेले असते की त्यातून मुद्दाम व्यायामासाठी घराबाहेर पडणे होतच नाही. अशावेळी घरच्या घरी काही सोपे आणि अगदी कमी वेळात होणारे व्यायामप्रकार केले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी तर हे व्यायाम उपयोगी पडतातच पण पायांना शेप येण्यासाठीही हे व्यायामप्रकार महत्त्वाचे आहेत. द योगिनी वर्ल्ड या इन्स्टाग्राम पेजवर ३ सोपे व्यायामप्रकार सांगण्यात आले आहेत. हे व्यायामप्रकार कोणते, ते कोणी आणि कसे करावेत याविषयी या पोस्टमध्ये विस्ताराने माहिती देण्यात आली आहे, पाहूयात या व्यायामप्रकारांबद्दल...

(Image : Google)

व्यायामप्रकार 

१. पाठ जमिनीला टेकवायची आणि गुडघ्यातून वाकून पायांचा ९० अंशाचा कोन होईल इतके खाली यायचे. यावेळी हात समोरच्या दिशेला घ्यायचे. या स्थितीत पाठ भिंतीला टेकलेली राहील याची काळजी घ्यायची. यामध्ये पायांना आणि पोटाच्या स्नायूंना ताण पडत असल्याने हा व्यायामप्रकार पोटाच्या खालच्या भागात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. सुरुवातीला कमी सेकंद या स्थितीत थांबून नंतर हळूहळू वेळ वाढवत न्यायचा.

२. एका पायाचा अंगठा भिंतीला टेकलेला राहील असा पाय ठेवायचा. दुसरा पायाचा गुडघा शरीराच्या सरळ रेषेत राहील असा ठेवायचा. दोन्ही पायांचा परफेक्ट काटकोन होईल असे पाहायचे. हाताची बोटे भिंतीला टेकवून मागचा पाय गुडघ्यातून उचलून परत जमिनीवर टेकवायचा. यामुळे कंबरेपासूनच्या खालच्या स्नायूंना चांगला ताण पडतो. असे दोन्ही पायांनी २०-२० वेळा ३ सेट करावेत. यामुळे कंबरेवरची वाढलेली चरबी कमी होण्यास नक्की मदत होईल.

३. एक पाय काटकोनात वर उचलून तोच पाय सरळ रेषेत मागे न्यायचा. पाय मागे नेत असताना शरीर पुढच्या दिशेला वाकले जाईल त्यावेळी पाय आणि शरीर एका रेषेत येईल असा प्रयत्न करायचा. एका हाताने भिंतीचा आधार घेतला तर हे आसन करणे सोपे जाते. एकावेळा एका पायाने किमान १० वेळा आणि दुसऱ्या पायाने १० वेळा हा व्यायामप्रकार करावा. 

हे व्यायाम कोण करु शकते

१. नव्याने व्यायामाला सुरुवात केलेले कोणीही

२. लठ्ठपणाची समस्या असलेल्या व्यक्ती

३. गर्भवती महिला योग्य ती काळजी घेऊन यातील पहिले दोन व्यायामप्रकार करु शकतात.

४. ज्येष्ठ नागरिकांना हळूवारपणे हे व्यायामप्रकार करायला हरकत नाही. 

५. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी हे व्यायामप्रकार करावेत. मात्र व्यायाम करताना गुडघे दुखत असल्यास हे व्यायाम करणे टाळावे. 

६. ज्यांना अर्थ्राटीसचा त्रास आहे किंवा ज्यांचे घोटे, टाचा दुखतात त्यांनी हे व्यायामप्रकार टाळलेले बरे. 

७. मात्र भिंतीचा आधार घ्यायचा असल्याने ज्यांना बॅलन्स करता येत नाही त्यांच्यासाठी हे तिन्ही व्यायामप्रकार उपयुक्त ठरतात. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यलाइफस्टाइल