मनाली मगर-कदम
सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात कामांची यादी सुरू होते ते रात्री आपण अंथरुणावर पडलो तरी ती सुरूच असते. घरात काय आणायचं इथपासून ते नाश्ता, जेवणाला काय करायचं, साफसफाई, बँकेची किंवा बाहेरची इतर कामं, मुलांचे शेड्यूल, ऑफिस असे डोक्यात हजार विषय सुरू असतात. घरातलं सगळं आवरुन ऑफिससला जाणाऱ्या महिलांची तर खूपच तारांबळ होते. यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे कितीही ठरवले तरी होत नाही. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही, तर व्यायाम दूरच राहीला. व्यायामआरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय गरजेचा असल्याचे आपल्यालाा माहित असते. मात्र तरीही वेळच मॅनेज होत नाही ही तक्रार असतेच. व्यायाम करायला जमत नाही यासाठी पर्याय काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. व्यायामाला कोणताही पर्याय असूच शकत नाही, त्यामुळे आपण दिवसभरात इतक्या गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे व्यायामासाठी दिवसातून किमान १५ ते २० मिनीटे तरी आवर्जून काढायला हवीत. पण ते जमवावे कसे (Fitness Tips Easy Exercise Tricks)?
१. सकाळी अर्धा तास लवकर उठलात तर व्यायामाला नक्कीच वेळ मिळू शकतो.
२. सकाळी उठल्यावर आळस राहतो त्यासाठी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल हातात न घेता १० मिनीटांत करता येतील अशी आसने.
i) बालासन - यामुळे मणका लवचिक राहील व त्याची ताकद वाढेल.
ii) मार्जरासन - यामुळे पाठ दुखी होणार नाही
iii) पायाचे खांद्यांचे स्ट्रेचिंग करावे.
३. घरातील कामे सगळ्यांनी वाटून घेतली आणि थोडे पूर्वनियोजन केले तर कामे आटोक्यात येतील आणि व्यायामासाठी आपण किमान अर्धा तास तरी नक्की काढू शकू.
४. जाता येता करता येतील असे काही सोपे पर्याय
i) किचन मध्ये एखादा डबा मुद्दाम उंचावर ठेवावा, जो काढताना पूर्ण शरीर ताणले जाईल.
ii) जिने चढ उतार करणे हा उत्तम व्यायाम असल्याने घर, ऑफीस असे कुठेही जाताना जिन्याचा वापर करावा. एरोबिक्स च्या स्टेप चा वापर पायऱ्यांवरती करावा. ज्यामुळे हृदयाची ताकद वाढेल व कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होईल. रक्तवाहिन्या शुद्ध होतील.
iii) ऑफिसमध्ये ठराविक काळाने ब्रेक घेऊन खुर्ची, टेबल, भिंत, यांच्या आधाराने करता येतील असे स्ट्रेचिंगचे व्यायाम जरुर करावेत.
iv) जेवणाआधी कपालभाती, नाडी शुद्धी, अनुलोम-विलोम, सूर्य भेदन असे प्राणायाम व शुद्धिक्रिया करू शकता.
v) जेवणानंतर वज्रासन अवश्य करावे, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल.
vi) दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर किमान १० ते १५ मिनीटे चालावे.
vii) रात्री झोपताना दहा मिनिटे तरी स्ट्रेचिंग करावे. ज्यामुळे, दिवसभराचा थकवा निघून जातो. व सकाळी फ्रेश उठण्यास मदत होते.
५) पूर्ण आठवडा व्यायाम जमत नसेल, तर तीन दिवस तरी करावा. गाडी ऐवजी सायकलचा वापर, चालणे, ब्रिक्स वॉक असे काही ना काहीतरी किमान करावे.
(लेखिका योग शिक्षिका आहेत)
manali227@gmail.com