मनाली मगर-कदम
आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश अवश्य असायला हवा. यामध्ये आपले संपूर्ण शरीर हलले जाते आणि स्नायू बळकट होऊन शरीराची ताकद वाढण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी महिला बहुतांश कामे घरात करत असल्याने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कमी असल्याने कामांतून व्यायाम व्हायचा. मात्र आता बैठे काम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. तसेच आहारातील बदल, ताणतणाव यांमुळे वजन वाढत चालले आहे. महिलांना बरेचदा नोकरी, घर असे सगळे सांभाळून जिमला किंवा व्यायामाला जाणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी घरच्या घरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या टिप्स (Fitness Tips For Working Women)...
फक्त १५ मिनिटं आणि ५ गोष्टी! एवढंच करा, व्यायामही होईल -वाढेल एनर्जी, झटकेल आळस
१. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे आणि मग ताडासन करून दहा चकरा माराव्यात. ज्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होईल.
२. किचनमध्ये ओट्याला धरून स्कॉट्सचे प्रकार करता येऊ शकतात. यामध्ये पुश अप्स, लेक्चर प्रेसिंग, काफ प्रेझेंट, रेझिंग असे करू शकता.
३. बसण्यासाठी खुर्चीचा वापर न करता स्विस बॉलचा वापर करावा . ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.
४. सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा १२ सूर्यनमस्कार आवर्जून करावेत.
५. जवळच्या जवळ घरातल्या काही वस्तू आणायला चालत जाणे, जीने चढ-उतार करणे यांसारख्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे.
६. घरात लहान मुल असेल तर, त्याच्याबरोबर खेळावे. त्यांच्यामागे पळण्याने, त्यांच्याशी खेळण्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यामुळे मानसिक ताण कमी व्हायला मदत होईल आणि शरीराचा पूर्ण वापर होईल.
७. जेवणाआधी कपालभाती, श्वसनाचे प्रकार, प्राणायामाचे विविध उदाहरणार्थ अनुलोम-विलोम, सूर्य पेतन अवश्य करावे. याचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींसाठी अतिशय चांगला फायदा होतो.
८. रात्री झोपताना पायाचे स्ट्रेचिंग, बालासन, मार्जरासन, शशांकासन करावे.
९. चंद्रभेदन प्राणायाम केल्याने झोप छान लागेल, दिवसभराचा थकवा कमी होईल. मन शांत होऊन नकारात्मक विचार कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होईल.
१०. शरीराच्या व्यायामाबरोबरच मानसिक शांतीसाठी ध्यान करणेही अतिशय आवश्यक असते.
(लेखिका योग शिक्षिका आहेत)
manali227@gmail.com