चालण्याचा व्यायाम हा उत्तम व्यायाम समजला जातो. वजन कमी करण्यासोबतच स्नायुंची ताकद वाढवण्याचं काम हा व्यायाम करतो. चालायचं म्हणजे सरळ चालायचं. पुढे चालायचं. तसंही आपल्या कोणालाच मागे बघायला किंवा मागे फिरायला आवडत नाहीच पण चालण्याच्या व्यायामावर झालेला एक अभ्यास सांगतो की सरळ चालण्याचे जसे फायदे आहेत तसे उलटे चालण्याचेही फायदे आहेत. व्यायामाच्या भाषेत अशा चालण्याला रेट्रो वॉकिंग असं म्हटलं जातं. उलटं चालण्यानं म्हणजेच पाठमोरं चालण्यानं, उलटं पळण्यानं शरीरास अनेक फायदे होतात. फिटनेस तज्ज्ञ सांगतात की उलटं चालण्यामुळे स्नायुंना फायदा मिळतोच सोबतच वजन कमी होण्यासही मदत होते. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात सरळ चालून झालं की थोडा वेळ उलटंही चाला.
छायाचित्र- गुगल
रेट्रो वॉकिंगचे फायदे काय?
1. सरळ चालताना आपले गुडघे भरपूर काम करतात. गुडघ्यांवर ताणही येतो. उलटं चालण्यामुळे गुडघ्यांवरचा ताण कमी होतो. शिवाय गुडघ्यामधील हाडांना आधार देणार्या स्नायुंचं हलकं वॉर्मअपही होतं.
2. गुडघ्यांच्या मागचे स्नायू, पोटरीचे, मांडीचे स्नायू हे सरळ चालताना एकाच प्रकारचं काम करतात. पण जेचा आपण सरळ पुढे चालण्याच्या ऐवजी उलटं मागे चालतो तेव्हा या स्नायुंचा तो भाग कार्यरत होतो ज्याचा सरळ चालताना वापर होत नाही. उलटं चालण्यामुळे पायाचे सर्व स्नायू मजबूत होतात.
3. उलटं चालण्यामुळे शरीर लवचिक होतं शिवाय शरीराचा तोलही व्यवस्थित सांभाळता येतो. शरीराला एक प्रकारची स्थिरता उलटं चालण्यामुळे प्राप्त होते.
4. चालण्यानं, पळल्यानं वजन कमी होतं हे माहितीच आहे. पण उलटं चालण्यानं, पळल्यानं त्या तुलनेत अधिक उष्मांक जळतात. त्याचा परिणाम वजन कमी होण्यास होतो. त्यामुळे वजन कमी करणं हा उद्देश असेल तर रोज थोडं तरी उलटं चाललं किंवा पळायला हवं. फक्त उलटं चालताना, पळताना सुरक्षित जागा निवडावी.