व्यायाम हा चांगल्या जीवनशैलीचं प्रतिक मानलं जातो. लॉकडाऊनदरम्यान स्वतःला मेटेंन ठेवण्यासाठी अनेक महिलांचेही पाय जिमकडे वळाले. त्यातल्या काहीजणी रेग्यूलर व्यायाम करतात. तर काहीजणी मूडप्रमाणे दांड्या मारत कधीही जीमला जातात. अलिकडे दिसून येतंय की फिटनेसबाबत जागरूक असलेले बॉलीवुड स्टार्स आणि सेलिब्रिटी गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. त्यामुळे व्यायामाबाबत लोकांच्या मनात साशंकता निर्माण होतेय.
वयाच्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेणारा सिद्धार्थ शुक्ला अलिकडचेच एक उदाहरण आहे. सिद्धार्थ आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक राहणारा कलाकार होता. सिद्धार्थचे हार्ट अटॅकने निधन झाले. अशा स्थितीत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की जीममध्ये घाम गाळणारे बॉलिवूड अभिनेते आणि सेलिब्रिटी कमी वयात गंभीर आजारांचे शिकार कसे होतात.
हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू होणं सर्वांसाठीच धक्कादायक आहे. जर आपण गेल्या काही वर्षांबद्दल बोललो तर अनेक फिटनेस फ्रिक अभिनेते आणि सेलिब्रिटी हृदयरोग आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांना बळी पडले आहेत. ऋषी कपूर, इरफान खान यांसारख्या अभिनेत्यांनी कॅन्सरशी सामना करत जगाला निरोप दिला. तर सुशांत सिंह राजपूतचंही गेल्या वर्षी अगदी लहान वयात निधन झालं.
याबाबत आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?
फिटनेस फ्रिक सेलिब्रिटी अशा गंभीर आजारांना का बळी पडतात? याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ सत्यकांत त्रिवेदी यांनी अमर उजालाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. डॉ सत्यकांत स्पष्ट करतात की, ''फिटनेसबाबत सजग असणाऱ्या लोकांमध्येही हृदयविकारासारख्या समस्यांची अनेक कारणे असू शकतात. एकूणच आरोग्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे पुरेसे नाही, आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे देखील आवश्यक आहे.
सहसा अभिनेते आणि सेलिब्रिटी कामाच्या दबावामुळे झोपू शकत नाहीत, त्यांना अनेकदा त्यांचे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागते. याशिवाय त्यांना वैयक्तीक आयुष्यातील काही ताण तणाव असतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवते. परिणाम हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो.''
दिवसेंदिवस हृदयरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ का होतेय?
वाराणसीचे वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ.सौरभ सचन म्हणतात की, "काही वर्षांपूर्वीपर्यंत हृदयरोग सामान्यतः वयानुसार होणारे रोग म्हणून ओळखले जायचा. पण अलिकडच्या काही वर्षांत तरुण लोक देखील आजारांना बळी पडत आहेत. त्यात बॉलिवूडचे अभिनेते आणि सेलिब्रिटीज देखील समाविष्ट आहेत ज्यांना त्यांच्या चांगल्या लुकसाठी फिटनेस फ्रिक व्हावे लागते. वाईट जीवनशैलीच्या सवयी आणि अल्कोहोल-धूम्रपान हे याचे मुख्य कारण मानले जाऊ शकते. अल्कोहोल घेणं, धूम्रपान हृदयाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. या व्यतिरिक्त, खराब जीवनशैली, झोपेचा अभाव आणि आहारातील उच्च कोलेस्टेरॉल हृदयरोगाचा धोका वाढवते.''
जास्त व्यायाम करणंसुद्धा नुकसानकारक ठरू शकतं.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ''लोक सहसा असे गृहीत धरतात की ते जिम किंवा व्यायामासाठी जितका जास्त वेळ घेतील तितके ते तंदुरुस्त होतील, परंतु हे गृहितक बरोबर नाही. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम शरीरासाठी हानिकारक देखील असू शकतो.''
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक क्रिस्टोफ स्टेलिंग म्हणतात की, ''जिममध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. व्यायामादरम्यान रक्तदाब अनेकदा जास्त असतो. दीर्घकाळ अशी स्थिती हृदयरोगाचा धोका वाढवते. याव्यतिरिक्त, जे लोक दीर्घकाळ जास्त सक्रिय असतात. त्यांना गुडघ्याच्या गंभीर समस्या होण्याचा धोका जास्त असतो.''