-गौरी पटवर्धन
बारीक व्हायचं तर वजन कमी करायला हवं. वजन कमी करायचं तर जेवढ्या कॅलरीज आपण खाल्ल्या त्याहून जास्त खर्च करायला पाहिजेत, वजन कमी करण्याचा हा एक बेसिक नियम आहे. पण मग प्रश्न असा की प्रत्येक घासाला अशा कॅलरीज मोजणं शक्य आहे का? मुळात असं मोजत बसणंच किती बोअरिंग आहे. खाताना कॅलरीचा विचार काय करायचा सतत, एक तर ते शक्यही नाही आणि योग्यही नाही. कारण अन्न हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. आपण खात असलेल्या अन्नात कॅलरीज सोडून इतर अनेक घटक असतात आणि ते अमाप वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या प्रकारची प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स, रफेज स्निग्ध पदार्थ, कर्बोदकं असं खूप काय काय मिळून आपलं अन्न तयार होतं. त्यामुळे त्याला फक्त कॅलरी या एकाच मापात मोजण्याने आपलंच नुकसान होतं. पण या सगळ्या विचारातून एक शहाणपण आपण शिकू शकतो. ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी कॅलरी इन्टेक कमी करणं, अर्थात डाएटवर काम करणं आणि त्यासोबत व्यायाम करणं. मग अर्थातच पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे डाएटवर काम करायचं? म्हणजे काय करायचं? तर त्याचं सगळ्यांना साजेसं एकच एक उत्तर कोणीही देऊ शकत नाही. पण त्याचा एक थम्ब रुल मात्र आहे. तो म्हणजे साखर खाणं बंद करायचं. ते शक्य नसेल तर निदान कमीत कमी साखर खायची. त्यात साखर, गूळ, मध हे सगळं येतं. जितकं कमी खाऊ तितकं वजन कमी करण्यासाठी चांगलं. काहीजण म्हणतात की साखरेपेक्षा गूळ चांगला किंवा मध चांगला. पण तसा नीट अभ्यास करून कोणी निष्कर्ष काढलेला दिसत नाही. आणि समजा ते खरं असेल तरी तो गूळ किंवा मधसुद्धा कमीच खाणं श्रेयस्कर आहे. आणि डाएटसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम.
तात्पर्य काय, तर वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांनी साखर सोडावी आणि रोज किमान पाऊण तास एरोबिक व्यायाम करावा. आणि हे असं वर्षभर न थकता करावं. असं केल्याने वजन नक्की कमी होईल का?तर दुर्दैवाने अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. कारण वजन वाढण्यामागे ‘जास्त आणि चुकीचं खाणं’ यापलीकडेही अनेक कारणं असतात. थायरॉईडसारखे आजार असतात, आनुवांशिकता असते. अशी काही तब्येतीची तक्रार असेल तर हे सगळं करूनही वजन कमी होत नाही.मग प्रश्न असा येतो की जगातले सगळे चांगले पदार्थ सोडायचे, सगळ्या घरादाराच्या वेळा ऍडजस्ट करायच्या, ‘चालली मोठी व्यायामाला’ अशा कुजकट नजरांकडे दुर्लक्ष करायचं, घरातल्या इतर सदस्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालून आपण बकरीसारख्या नुसत्या भाज्या खायच्या… आणि एवढं करून जर वजन कमी होण्याची गॅरंटी नसेल तर हे सगळं का करायचं?तर व्यायाम केल्याने इतर असंख्य फायदे होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटनेस वाढतो. तोच तो, भाजी उचलून आणायला, खाली वाकून कपाटाखालची फिरकी काढायला, माळ्यावरचे डबे खाली काढायला कमी येणारा फिटनेस. व्यायाम करण्याचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे येणारा ‘सेन्स ऑफ वेलबीइंग’.व्यायाम केल्याने शरीराबरोबरच मनावरची मरगळ झटकली जाते. समोर दिसत असलेले रोजचे प्रॉब्लेम्स कमी त्रासदायक वाटतात. आजूबाजूला परिस्थिती फारशी काही वाईट नाहीये असं वाटायला लागतं. रोज तासभर खर्च करून आयुष्य छान समाधानी वाटणं हे व्यायाम करण्यासाठी पुरेसं कारण असू शकतं. त्यामुळे बारीक होणं न होणं सोडा, आधी व्यायामाला लागा.. मग आहेत पुढे फिट होण्याचा खरा प्रवास.