कोविड १९ च्या प्रार्दूभावामुळे अनेजकजण घरी बसून काम करत आहेत. घरुन काम करण्यात सुरक्षितता आणि सोय या दोन्ही गोष्टी आहेत. ऑफिसला पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागत नाही. प्रवासातला वेळ कामासाठी देता येतो. घरुन काम करण्यानं शरीराची होणारी दमणूकही होत नाही. घरुन काम करण्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. घरुन काम करणं सवयीचं झाल्यानंतर हे तोटे आता जाणवायला लागले आहेत. घरुन काम करण्यानं शारीरिक हालचाल निम्म्यानं कमी झाली आहे. शारीरिक हालचाल कमी करावी लागणं यात आरामाचा आनंद काही काळ वाटतो. पण नंतर शरीराचे एक एक दुखणे जाणवू लागतात. सतत एका जागी बसून काम केल्यानं आणि काम झाल्यानंतरही शरीराला फारशी हालचाल नसल्यानं अंगदुखी, कंबर आणि पाठदुखी, सांधे आखडणं यासारखे त्रास अनेकांना सुरु झाले आहेत. शरीराची हालचाल असली की रक्तप्रवाह सुरळीत राहायला, शरीरातील दाह कमी व्हायला आणि सांध्यांना वंगण मिळायला मदत होते. पण घरुन काम करत असल्यानं शारीरिक हालचालींवर खूप मर्यादा आल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शरीराचं दुखणं आणि मानसिक समस्य्या दोन्हीही वाढलं आहे.घरी बसून काम करणं हे त्रासदायक होत असलं तरी योग साधनेचा आधार आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासावरही लाभदायक ठरु शकतो. याप्रकारच्या त्रासात योगसाधनेतील पाच आसनं लाभदायक ठरतात.
- उष्ट्रासन: या आसनानं पोट, मांड्या आणि छातीच्या स्नायूंचा व्यायाम होतो. कंबरदुखी, पाठदुखी हे त्रास या आसनानं कमी होतात. हे आसन करण्यासाठी गुडघे जमीनीला टेकून ताठ बसावं. दोन्ही हात कानाच्य रेषेत सरळ करावेत आणि हात मागे नेत शरीर मागे झुकवावं. दोन्ही हातांनी पायाच्या टाचा पकडाव्यात. या अवस्थेत सहा ते सात सेकंद राहावं आणि हळूवार आसन सोडावं. मानेचं दुखणं असल्यास तेही या आसनानं जातं आणि मणका ताठ राहातो.
अपानआसन:- शरीरावरचा ताण घालवण्यासाठीचं हे उत्तम आसन आहे. पोटातील वायू मोकळा करण्यासाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी, पोटाचा जडपणा कमी करण्यासठी तसेच पित्त, बध्दकोष्ठता या समस्या घालवण्यासठी अपानआसन उपयोगी पडतं. यासाठी पाठीवर झोपावं. दोन्ही गुडघे छातीच्या दिशेनं वर घ्यावे. दोन्ही हातांनी गुडघ्यांना मिठी मारावी. या अवस्थेत श्वासोच्छवास सूरु ठेवावा. मग मान वर उचलून कपाळ मिठी मारलेल्या गुडघ्यांना टेकवावं. या अवस्थेत पोटावर दाब येतो. पाच सहा सेकंदानंतर श्वास सोडत डोके जमिनीवर ठेवून. गुडघ्याची मिठी सोडवावी आणि पाय जमिनीवर सरळ करावेत.
धनूरासन:- शरीर वाकवणारं हे आसन वजन कमी करण्यास, वजन संतुलित ठेवण्यास मदत करत. ओटीपोटावरची चरबी कमी करण्यास ,पचनक्रिया सुधारण्यास हे आसन मदत करतं. हे आसन करताना पोटावर झोपावं. चेहेरा खाली झुकलेला असावा. संथ श्वसन सुरु ठेवावं. पाय गुडघ्यात वाकवावे. हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडावे. नंतर हनुवटी वर उचलत चेहेरा वर करावा आणि जितकं शक्य असेल तितकं शरीर मागील बाजूस ताणावं. या स्थितीत २० - ३० सेकंद राहावं. नंतर हळूच पाय जमिनीवर ठेवावेत आणि छाती जमिनीवर टेकवावी.
बालासन:- शरीरास शांतता आणि आराम देणारं हे आसन आहे. बसून बसून पाठीच्या खालील बाजूस जो ताण येतो तो या आसनाद्वारे निघून जातो. त्यामुळे छान आरामदायी आणि आल्हाददायक वाटतं. हे आसन करताना गुडघे वाकवून टाचांवर बसावं. मग हात कानाच्या रेषेत सरळ करावेत.हातासह शरीर पुढील बाजूस झुकवावं. दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवावेत आणि कपाळ जमिनीवर टेकवावं. या स्थितीत दीर्घकाळही राहाता येतं. आसन सोडतांना हळुवार वर यावं. आणि पुन्हा गुडघे वाकवून टाचांवर बसावं.
भूजंगासन:- भूजंगासनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन सूर्यनमस्कारातही समाविष्ट आहे. या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना आकार येतो तसेच पाठ आणि खांदे बळकट होतात. या आसनानं रक्तप्रवाह सूधारतो आणि शरीराला आलेला थकवा आणि ताण निघून जातो. हे आसन करताना जमिनीवर पालथं झोपावं. पोट जमिनीला टेकलेलं असावं आणि हातांचे तळवे हे छातीखाली दाबलेले असावे. श्वास घेत हनुवटी वर करावी आणि हातांच्या तळव्यांवर दाब देत छाती वर उचलावी. छाती वर उचलताना हात पूर्ण ताठ न करता कोपरात वाकलेले असावे आणि छातीपासून पोटापर्यंतचा भाग वरच्या दिशेनं ताठ असावा. या स्थितीत २० ते ३० सेकंद राहावं. नंतर श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवावं. आणि हाताचे तळवे पुन्हा छातीखाली दाबावेत.