फिट आणि एक्टिव्ह राहण्यासाठी मॉर्निंग वॉक हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे दिवसाची सुरुवात तर चांगली होतेच पण त्याचबरोबर आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित मॉर्निंग वॉकमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि तुम्हाला दिवसभर एक्टिव्ह वाटतं. सकाळची सुरुवात चांगली केल्याने दिवसभर मूड चांगला राहतो.
वजन कमी करण्यासाठी कॅलरीज बर्न करणं आवश्यक आहे आणि यामध्ये मॉर्निंग वॉक खूप उपयुक्त ठरतो. मात्र यासाठी चालताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मॉर्निंग वॉक करताना काही सोप्या टिप्स फॉलो केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. चालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून वजन लवकर कमी करता येईल हे जाणून घेऊया...
वजन कमी करण्यासाठी चालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात
चालण्याचा योग्य वेग
कॅलरी बर्न करण्यासाठी चालण्याचा वेग महत्त्वाचा आहे. जेव्हा वेग जास्त असतो तेव्हा जास्त कॅलरीज बर्न होतात आणि मेटाबॉलिज्म क्रिया देखील एक्टिव्ह राहते. यामुळे दिवसभर कॅलरीज बर्न होत राहतात. वेगाने चालल्याने स्नायूही सक्रिय होतात आणि हृदयाचे आरोग्यही सुधारतं. मॉर्निंग वॉक करताना फास्ट चालणं अधिक फायदेशीर ठरू शकते.
वेगात बदल
चालताना, वेगाने चालण्याऐवजी वेळोवेळी वेगात बदल करत राहणं देखील आवश्यक आहे. काही वेळ वेगाने चालल्यानंतर तुमचा वेग कमी करा आणि काही वेळाने पुन्हा वाढवा. अशा प्रकारे चालण्याने कॅलरीज बर्न करण्यासोबतच तुमची नियमित हालचालही कायम राहते आणि तुम्ही लवकर थकणार नाही.
चढ-उतारावर चालणं
हिरव्या गवतात अनवाणी चालणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, परंतु जर तुम्हाला कॅलरी लवकर बर्न करायच्या असतील तर चालताना चढ-उतारावर चालणं अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे स्नायू तसेच संपूर्ण शरीर एक्टिव्ह होण्यास मदत होईल.
पोश्चर नीट ठेवा
चालताना शरीर योग्य स्थितीत ठेवणं महत्वाचं आहे. पुढे वाकून चालल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि वेदना होऊ शकतात. चालताना नेहमी तुमचं पोश्चर नीट ठेवा. चालताना आपले खांदे रिलॅक्स ठेवा आणि आपले डोळे समोरच्या दिशेने ठेवा.
लवकर वजन कमी करण्यास होते मदत
चालताना या सोप्या टीप्सचं पालन केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवावं लागेल की, चालणं हे नियमितपणे केलं पाहिजे आणि चालण्याची वेळ किमान अर्धा तास असावी. दररोज मॉर्निंग वॉकमुळे वजन कमी करण्यासोबतच एकूण आरोग्यावरही चांगला परिणाम होतो आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. यासोबतच मानसिक आरोग्य उत्तम राहिल्याने तुमचा मूडही चांगला राहील.