वजन कमी करणे ही आपल्यासाठी अनेकदा आव्हानात्मक गोष्ट असते. वाढलेलं वजन कमी करणे आपल्याला जसे अवघड जाते, त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्रींसाठीही काही वेळा वजन कमी करणे हा मोठा टास्क असतो. वेगवेगळ्या कारणाने वाढलेले हे वजन कमी करताना आपला कस लागतो, तसाच त्यांचाही लागतो. आपल्याप्रमाणेच अभिनेत्रींनाही आपले डाएट, व्यायाम अशा जीवनशैलीतील अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागतो. कधी एखाद्या भूमिकेसाठी तर कधी प्रेग्नन्सीनंतर फिगर मेंटेन करण्यासाठी अभिनेत्रींपुढे वजन कमी करण्याचे आव्हान असते. बऱ्याचदा बॉलिवूड अभिनेत्री आपला आहार आणि व्यायाम याकडे अतिशय बारकाईने लक्ष देत असतात (Weight Loss Journey). प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख (Genelia DSouza) हिने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जेनेलिया व्यायाम करताना दिसत आहे. तसेच व्यायामाच्या माध्यमातून तिने दर आठवड्याला किती वजन कमी केले हेही यामध्ये दाखवण्यात आले आहे (How Genelia Deshmukh Loses 4 kg in 1.5 Month).
जेनेलियाचा फिटनेस प्रवास या माध्यमातून आपल्यासमोर आला आहे. तिने अवघ्या ६ आठवड्यात म्हणजेच केवळ १.५ महिन्यात ४ किलो वजन कमी केले आहे. वजन वाढवणे अतिशय सोपे असते पण ते कमी करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट ज्यांनी घेतले आहेत त्यांनाच ठाऊक असतात. आपल्या या प्रवासाबाबत तिने अतिशय हृदयस्पर्शी अशी पोस्टही लिहीली आहे. व्यायामामुळे आणि वजन कमी केल्यामुळे आपल्याला अतिशय कॉन्फिडंट आणि शिस्तीचे वाटत असल्याचे जेनेलियाचे म्हणणे आहे. व्यायामाला सुरुवात केली तेव्हा जेनेलियाचे वजन ५९.४ होते. नियमित व्यायाम आणि डाएट यांच्या मदतीने तिने तब्बल ४ किलो वजन कमी केले असून आता तिचे वजन ५५.१ इतके आहे.
या व्हिडिओमध्ये जेनेलिया एका जिममध्ये वर्कआऊट करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वेगवेगळ्या मसल्स ट्रेनिंगपासून ते कार्डिओ वर्कआऊटपर्यंतच्या अनेक गोष्टी ती करताना दिसते. इतकेच नाही तर या क्लीपमध्ये तिचा पती अभिनेता रितेश देशमुखही एक-दोन ठिकाणी दिसतो. त्यामुळे तिच्या या वजन कमी करण्याच्या प्रवासात तिला नवऱ्याची चांगली साथ असल्याचे दिसते. एकूण काय तर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून ठरवली तर ती तुम्ही नक्कीच साध्य करु शकता, फक्त त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असायला हवी. त्यामुळे तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल पण व्यायामाचा आळस येत असेल तर जेनेलियाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरु शकतो.