सतत थकवा जाणवणं, पचन नीट न होणं, वजन वाढणं, थायरॉइड ग्रंथींशी संबंधित समस्या . या सर्व शारीरिक आणि मानसिक समस्या आहे. यांचा एकमेकांशी संबंध आहे असं नाही. या समस्यांवर उपाय काय म्हटलं तर उपायांची मोठी यादीच देतील अनेकजण. पण या सर्व समस्यांवर एकच उपाय सांगा असं म्हटल्यास, ते कसं शक्य आहे? असाच प्रश्न पडेल . पण योग साधनेत या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हलासन. आज निरोगी, कार्यप्रवण, उत्साही आणि आनंदी राहायचं असेल तर आपल्या दैनंदिन आयुष्यात योगला स्थान देणं, त्याचा रोज सराव करणं आवश्यक झालं आहे. वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळी आसनं आहेत. योगाभ्यासादरम्यान ही विविध आसनं केल्याने निरोगी होण्याचा एकमेव प्रभावी परिणाम होतो. या योगसाधनेतील हलासन या एका आसनाचे शारीरिक आणि मानसिक पातळीवर परिणाम अनुभवण्यास मिळतात. मनावरचा ताण घालवण्यासोबतच शरीर मजबूत करण्यासाठी हलासन केलं जातं. यासोबतच आणखी अनेक फायदे हलासन केल्यानं मिळतात.
Image: Google
हलासन ?
हलासन म्हणजे जमिन नांगरण्यासाठी वापरलं जाणारं नांगर, ज्याला हिंदीमधे हल म्हटलं जातं. या आसनादरम्यान शरीराची हलासारखी स्थिती होते म्हणून या आसनाला हलासन असं म्हटलं जातं. यालाच इंग्रजीमधे ‘प्लो पोज’ असं म्हटलं जातं.
हलासन करण्याआधी..
1. योग आसनातील प्रत्येक आसन करण्याचे विशिष्ट नियम असतात . त्याप्रमाणेच हलासनाचेही आहेत. योग तज्ज्ञ सांगतात की हलासन हे सकाळी आणि रिकाम्या पोटी करावं.
2. जर काही कारणास्तव हे आसन सकाळी करण्यास जमलं नाही तर मग हलासन संध्याकाळी केलं तरी चालतं. अट एकच की हलासन हे दुपारच्या जेवणानंतर किमान चार तासानंतर करायला हवं.
3. हलासन करताना पोट व्यवस्थित साफ झालेलं असणंही आवश्यक आहे.
हलासन करताना..
हलासन करताना स्वच्छ आणि समान पृष्ठभाग असेल अशा ठिकाणी योगा मॅट किंवा चादर टाकावी. नंतर पाठीवर सरळ झोपावं. दोन्ही हात मांड्याच्या जवळ जमिनीला टेकलेले असावेत. एक दीर्घ श्वास घेऊन दोन्ही पाय हळूहळू पण एकसाथ वर उचलावेत. कंबर दोन्ही हातांनी पकडावी. कंबरेच्या सहाय्यानं दोन्ही पाय डोक्याच्या पाठीमागे न्यावेत. दोन्ही पायांची बोटं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. पहिल्या प्रयत्नात हे जमेलच असं नाही. पण सरावानं जमतं. जमिनीला पाय टेकल्यानंतर दोन्ही हातांनी एकतर पायाच्या अंगठ्यांना पकडावं किंवा दोन्ही हात जमिनीवर सरळ रेषेत ठेवावेत किंवा दोन्ही हात जमिनीवर टेकवून एकमेकात गुंफवावे. यामुळे पोट, पाठ, हात, मांड्या यांना ताण मिळतो. आपला दमसास टिकेल तेवढा वेळ या आसनात रहावं. मग पाय वर सरळ रेषेत आणावे. दोन्ही हातांनी कंबर धरावी. आधी कंबर जमिनीला टेकवावी आणि नंतर पाय जमिनीला टेकवावेत. दोन्ही हात पुन्हा मांड्याच्या बाजूने सरळ जमिनीला टेकलेले असावेत. या आसनाचे किमान 5 सेट करावेत.
Image: Google
हलासनाचे फायदे
1. नियमित हलासनाचा सराव केल्यास मनावरचा ताण आणि थकवा निघून जातो.
2. हलासनाचा सराव नियमित केल्यानं मेंदू शांत राहातो.
3. या आसनामुळे पाठीचा कणा आणि खांदे हे ताणले जातात.
4. हलासनामुळे थायरॉइड ग्रंथीशी निगडित समस्या कमी होण्यास मदत होते.
5. या हलासनात पाय उलट्या दिशेनं जमिनीला टेकल्यामुळे पोटावर भार पडतो. त्याचा परिणाम म्हणजे पचनाशी संबंधित अवयवांचा मसाज होतो आणि त्यामुळे पचन सुधारतं.
6. हलासन केल्यानं पचनक्रिया सुधारते तसेच वजन कमी करण्यासाठी हलासनाचा उपयोग होतो.
7. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते.तसेच रक्तदाबाशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो.
8. पाठीचा कणा ताठ राहाण्यास, कणा लवचिक होण्यास मदत मिळते. या आसनामुळे कंबरदुखीसही आराम मिळतो.
आसनाची दक्षता
1. हलासन हे कधीही नुसता फोटो किंवा व्हिडीओ बघून करु नये. हलासना हे आधी योग प्रशिक्षकाकडून शिकून त्यांच्या देखरेखीत करावं आणि सराव झाल्यास ते आपलं अपण केलं तरी चालतं.
2. अगदी सुरुवातीला हलासन करताना मानेवर थोडा ताण जाणवतो. पण हलासनाचा नियमित सराव केल्यास हा ताण नंतर विशेष काही जाणवत नाही.
3. पोट खराब असल्यास, अपचनाचा त्रास होत असल्यास हे आसन करु नये.
4. रक्तदाब आणि दमा यासारख्या आरोग्यविषयक समस्या असतील तर तज्ज्ञ हे आसन न करण्याच सल्ला देतात.