गौरी पटवर्धन
व्यायाम करा, व्यायाम करा असं सगळेच म्हणतात, सगळ्यांना पटतं, परस्परांना सल्ले देतात, गिल्टही देतात. पण मुळात कशाला कसरत करकरुन जीवाला त्रास द्यायचा याचं उत्तर आपलं आपल्याला पटलं पाहिजे. दुसरं म्हणजे मुळात हे मान्य असलं पाहिजे की व्यायामाचे फायदे आहे. आपण कोणतीही गोष्ट फायदा असेल तर अगदी करतोच. मग व्यायामचे फायदे काय?
१. सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपली एनर्जी लेव्हल सुधारते. आपल्याला संपूर्ण दिवस फ्रेश वाटतं. सारखा थकवा आणि मरगळ यायची बंद होते. दुसरा फायदा म्हणजे वजन कमी झालं किंवा नाही तरी इंचेस लॉस होतो. म्हणजे काय? तर वेस्ट साईझ कमी होतो, जाड झालेले दंड बारीक होतात. वजन खूप कमी झालं नाही तरी हे बदल होऊ शकतात. व्यायाम करत असतो आणि फिट असतो त्यावेळी केवळ त्या फिटनेसमुळे आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होतात.
२. व्यायाम केल्याने शरीरातील फॅट्स जळतात. त्याबरोबर आपली कॅलरीजची बेरीज वजाबाकी जर जमली नाही, तर वजन कमी होत नाही, पण चरबी तर जळतेच. शिवाय व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. म्हणजेच ज्याला मसल टोन म्हंटलं जातं, तो सुधारतो. त्यामुळेच जरी वजन कमी होतांना दिसलं नाही, तरी व्यायाम करणं फार महत्वाचं असतं. कारण अशी न दिसणारी चरबी आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. आणि व्यायामाने ही चरबी जाळायला मदत होते. ही चरबी प्रामुख्याने कुठे असते?
३. बायकांच्या बाबतीत ही चरबी प्रामुख्याने साठते ती मांड्या, नितंब आणि पोटाच्या घेरावर. अशी चरबी साठल्याने काय होतं? तर त्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. ज्याला व्हिसेरल फॅट म्हणतात, म्हणजेच पोटाच्या आतली चरबी जी असते तिच्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. एकूणच वजन वजन वाढल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो. वजन वाढल्याने सांधे दुखायला लागतात. कारण सांध्यांना जास्त वजन उचलावं लागतं. पाय दुखायला लागतात. आणि मग ते दुष्टचक्र भेदणं फारच कठीण होऊन बसतं. पाय दुखतात म्हणून व्यायाम करता येत नाही आणि व्यायाम न केल्याने वजन वाढतं त्यामुळे अजूनच पाय दुखतात. पण आपण जर नियमितपणे व्यायाम करत राहिलो तर सांध्यांची आणि स्नायूंची ताकद वाढते. आणि मग हे सगळे रोग होण्याची शक्यता कमी होते. ज्यांचे पाय, पाठ, कंबर दुखतात त्यांना दुखण्यामुळे व्यायाम करण्याची इच्छा होतं? नाही. पण त्यातली मेख अशी आहे की अशी बरीचशी दुखणी व्यायाम केल्याने कमी होतात किंवा पूर्णपणे बरीही होऊ शकतात.
४. व्यायाम करण्याचा अजून एक अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे स्किनवर ग्लो येतो. त्वचा तजेलदार दिसायला लागते. हे कशामुळे होतं? तर आपण व्यायाम केला की आपल्याला घाम येतो. तो त्वचेवरच्या रंध्रांतून बाहेर येतो. घाम येण्याच्या प्रक्रियेत त्वचेजवळ रक्ताभिसरण वाढतं. म्हणजेच त्वचेला जास्त रक्तपुरवठा होतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो? तर पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून वाफ घेतल्याने जे होतं, ते सगळं व्यायामाने होतं? आणि तेही सगळ्या शरीरावरच्या त्वचेचं. त्यामुळेच व्यायाम करतांना भरपूर घाम आला पाहिजे. सध्या आपल्याला सगळं सतत स्वच्छ, कोरडं, सुगंधी, हायजेनिक वगैरे वगैरे पाहिजे असतं. पण आपल्या त्वचेला मात्र घाम यायला पाहिजे असतो.
व्यायाम करण्याचे आजार टाळणे आणि स्किन टोन सुधारणे हे दोन उपयोग तर आहेतच. त्याखेरीजही हे अनेक फायदे आहेत.
आता तुम्ही ठरवा, व्यायामाचे हे फायदे हवेत की नको..