वाढत्या वयात शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्सचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. त्याचाच एक परिणाम म्हणजे शरीराची सुडौलता (body shape) नाहीशी होते. कोणत्याही स्त्रीला वय वाढत असलं तरी शरीरानं बेढब दिसणं मान्य नसतं. पण केवळ वाटल्यानं बाॅडी शेपमध्ये राहात नाही. वयाचा आकडा कितीही असू देत सुडौल राहाता येणं हे अवघड आव्हानासारखं वाटत असलं तरी काही सवयी जोपासल्यास (good habits for keeping body in shape) हे आव्हान सहज पेलता येण्यासारखं आहे. त्यासाठी बाॅडी शेपमध्ये ठेवणाऱ्या या चांगल्या सवयी माहित असणं आवश्यक आहे.
Image: Google
1. व्यायाम करा आनंदानं
रोज व्यायाम केल्यानं फिटनेस राखता येतो. पण बळजबरीनं व्यायाम करत असाल, व्यायाम मनापासून करत नसाल तर त्या व्यायामाचा शून्य उपयोग होतो. शरीर सुडौल राखण्यासाठी केवळ व्यायाम करणं महत्वाचं नाही तर व्यायाम आनंदानं करणं महत्वाचं आहे. आनंदानं व्यायाम करण्याची सवय जोपासल्यास रोज एकच एक रुटीन व्यायाम करणं टाळलं जातं. रोज नवनवीन व्यायाम प्रकार करुन व्यायामातील वैविध्य आणि आनंद जोपासला जातो. वेगवेगळा व्यायाम केल्यानं व्यायामातला उत्साह वाढतो, उत्साह वाढला की व्यायाम करण्याची क्षमता वाढते. अवघड व्यायाम प्रकार शिकण्याची, करण्याची इच्छा निर्माण होते. व्यायाम करताना आपल्या क्षमता ओलांडणं ही आवश्यक बाब आहे. ती आनंदानं व्यायाम केल्यानं साध्य होते.
2. काय खाऊ नये याकडे लक्ष देणं
भूक लागल्यावर साधारणपणे खाण्याचा विचार केला जातो. पण शरीर सुडौल राखायचं असेल तर काय खावं यापेक्षा काय खाऊ नये याचा विचार आधी करायला हवा. आरोग्यास आणि फिटनेससाठी हानिकारक पदार्थ कोणते हे ओळखून ते आहारातून टाळण्याची सवय लावणं आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश सजगतेनं केल्यास बाॅडी शेपमध्ये ठेवणं हे अवघड काम नसतं.
Image: Google
3. बाहेर जाताना खाण्याचा डबा पाण्याची बाटली सोबत नेणं !
कामानिमित्तानं बाहेर पडल्यावर जेव्हा केव्हा भूक, तहान लागेल तेव्हा आपला खाण्याचा डबा आणि पाण्याची बाटली सोबत असायला हवी. कारण घरात असताना खाण्या पिण्याचे कितीही नियम पाळले आणि बाहेर गेल्यावर मात्र ते मोडले तर त्याचा शरीरावर नकारात्मकच परिणाम होतो. बाहेरचे पदार्थ खाण्या पिण्यामुळे शरीरात अनारोग्यकारक घटक जातात जे वजन वाढण्यासही कारणीभूत ठरतात. त्यामुळे बाहेर जाताना घरी तयार केलेल्या जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली सोबत असायलाच हवी असं तज्ज्ञ म्हणतात.
4. सतत कार्यशील राहाणं
एका जागी बसून राहाणं हे आरामदायक वाटत असलं तरी ही बाब आरोग्यासाठी हानिकारक तर असतेच पण यामुळे शरीरही बेढब होतं. एका जागी जास्तीत जास्त वेळ बसणं टाळणं, शरीर सतत क्रियाशील राहिल याची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी लिफ्ट टाळून जिने चढणं- उतरणं, जवळच्या कामांसाठी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारणं, बागेत किंवा घरात शारीरिक कष्टाची कामं आनंदानं करणं, शरीराचा व्यायाम होईल आणि मनाला आनंद मिळेल असा खेळ खेळणं या गोष्टी केल्यास शरीर सतत क्रियाशील तर राहातंच सोबतच बाॅडीही शेपमध्ये राहाते. हे सर्व उपाय बघितल्यास शरीराची सुडौलता राखण्यात अवघड ते काय असाच प्रश्न पडेल.