दिवाळी ३ दिवसांची असली तरी दिवाळीची तयारी मात्र चांगलीच १०- १५ दिवस आधीपासून सुरु होते. घराची स्वच्छता, आवराआवरी, फराळाची तयारी, घराची सजावट, खरेदी, आलेल्या पाहुण्यांची सरबराई हे सगळं करताना खूपच दमछाक होऊन जाते. दिवाळी झाली की मागील १०- १५ दिवसांपासून सुरू असलेली धांदल, गडबड, गोंधळ एकदम शांत होतो आणि मग थकवा जाणवायला सुरूवात होते. अशातच दिवाळीच्या दिवसांत खाण्यापिण्याचं सगळं वेळापत्रक बिघडतं. त्यामुळेही अशक्तपणा जाणवू शकतो किंवा खूप जास्त खाल्ल्यामुळे अपचन, ॲसिडिटी असे त्रास सुरू होतात. हे सगळे त्रास दुर करण्यासाठी आणि दिवाळीत खूप धावपळ झाल्यामुळे आलेला थकवा घालविण्यासाठी घरातल्या घरात हे काही सोपे उपाय करून बघा. हे उपाय सोपे आणि आपल्याला माहिती असणारेच आहेत. पण हे उपाय आपला थकवा घालविण्यासाठी एवढे उपयुक्त ठरू शकतात, याची आपल्याला कल्पना नसते एवढंच.
दिवाळीचा थकवा घालविणारे काही भन्नाट उपाय १. मस्त झोप काढाशांत झोप न लागणं हे थकवा येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. दिवाळीची सगळी तयारी करण्यात व्यस्त असल्यामुळे बऱ्याच जणींना दिवाळीच्या ८- १० दिवस आधीपासूनच रात्री झोपण्यास उशीर होतो आणि सकाळी लवकर उठावं लागतं. दिवसभर कामाचा ढीग उपसावा लागतो. अपूर्ण झोप आणि दिवसभर काम यामुळेही काही जणींना प्रचंड थकवा आलेला असतो. म्हणूनच दिवाळीनंतर किमान दोन- तीन दिवस तरी रात्रीची झोप चांगली ८- ९ तासांची मिळेल, असे नियोजन करा. शक्य झालं तर दिवाळीनंतरचा एखादा दिवस दुपारीही मस्त ताणून द्या. आराम करा.
२. आहारात थोडा बदल कराझोप काढूनही अशक्तपणा जात नसेल तर आहारात थोडा बदल करा. हिरव्या पालेभाज्यांचं सूप, टोमॅटो सूप, फळे, काळ्या मनुका, बीट, खजूर, टोमॅटो, व्हिटॅमिन सी असणारी फळे यापैकी जेवढं शक्य असेल तेवढं भरपूर खा. तसेच थकवा घालवायचा म्हणून चहा- कॉफी, कोल्ड्रिंक यांचे अतिसेवन टाळा.
३. लाईट म्युझिक ऐकाथकवा आलेला असला की टीव्ही पाहण्याचाही कंटाळा येतो. टिव्हीचा आवाजही ऐकावा वाटत नाही. अशावेळी मस्त लाईट म्युझिक ऐका. तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी ऐका फक्त ती फार ढिंचॅक म्युझिक असणारी नको. शांत गाणी मनालाही शांती देतात आणि आलेली मरगळ झटकून टाकण्यास मदत करतात.
४. दिर्घ श्वसन कराहा देखील थकवा घालविण्याचा आणि मनावरचा ताण कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. दिर्घ श्वसन करण्यासाठी एका जागी शांत बसा. पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घ्या. पायांची मांडी घाला आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास कसा घेतो, कसा सोडतो याकडे लक्ष द्या. जेवढा जास्त श्वास छातीत भरून घेता येईल, तेवढा मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न करा आणि तेवढ्याच शांततेत श्वास सोडा.
५. तुम्हाला जे आवडेल ते करादिवाळीचा थकवा घालवायचा असेल तर पुढील एक- दोन दिवस तुम्हाला आवडेल त्या गोष्टी करा. नावडत्या गोष्टी अजिबात करू नका. कारण आपल्याला एखादी नावडती गोष्ट करायची आहे, या विचारानेच आपण अर्धे थकून जातो. त्यामुळे अशा सगळ्या न आवडणाऱ्या गोष्टी करणं टाळा. त्याउलट तुमचे छंद जोपासा.