वजन वाढणं ही सोपी आणि वेगवान प्रक्रिया आहे. पण वजन कमी करणं ही किचकट आणि वेळखाऊ गोष्ट आहे. आज व्यायाम केला आणि उद्या वजन कमी झालं असं होत नाही. आणि संयम बाळगून प्रयत्न करण्याची मानसिकता नसेल तर ना नियमित व्यायाम होत नाही की वजन घटत नाही. यामुळे निराश व्हायला होतं. पण कार्डिओ व्यायाम हा असा व्यायाम प्रकार आहे जो नियमित केल्यास वजन झपाट्यानं कमी होतं. कार्डिओ व्यायामचेही अनेक प्रकार आहेत. पण त्यातले पाच प्रकार हे वजन वेगानं घटवण्यासाठी परिणामकारक मानले जातात. प्रत्येक व्यायाम प्रकारचे वेगवेगळे फायदे असले तरी सगळ्यांमधे एक समान धागा आहे तो म्हणजे वजन कमी होण्याचा. कार्डिओ प्रकारचे व्यायाम करुन वजन कमी करण्याचं ठरवलं असेल तर व्यायामाच्या तीव्रतेकडे लक्ष द्यायला हवां. कार्डिओ व्यायामाची इंटेंसिटी जितकी अधिकी तितके शरीरातील उष्मांक अधिक जळतात आणि वजन वेगानं कमी होतं.
धावणे
वजन कमी करण्यासाठी नियमित धावणे हा उत्तम व्यायाम आहे. वजनावर परिणाम दिसून येण्यासाठी धावताना जास्त अंतर धावणं गरजेचं असतं. जर ट्रेडमिलवर धावणार असाल तर आधीच एक विशिष्ट वेळ आणि अंतर ठरवून घ्यावं. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने घटते.
सायकलिंग
सायकलिंग केल्यानं जवळजवळ प्रतितास 1,150 उष्मांक जळतात. सायकल जोरात न चालवता मध्यम गतीनं चालवली तरी 675 उष्मांक जळतातच. वजन वेगानं घटवण्यासाठी सायकलिंग करणं योग्य मानलं जातं. काही मिनिटं जास्त वेगानं सायकल चालवावी आणि मग काही मिनिटं हळू सायकल चालवावी. सायकल चालवताना वेग कमी जास्त केल्यास वजन वेगानं कमी होतं.
दोरीवरच्या उड्या मारणे
दोरीवरच्या उड्या नियमित मारल्यास खांदे मजबूत होतात. उष्मांक जळतात. वजन कमी करण्यासाठी हळूहळू उड्या मारुन उपयोगाचं नाही. त्यामुळे एका मिनिटात जितक्या शक्य आहे तितक्या जास्त आणि वेगाने उड्या माराव्यात. एक मिनिटानंतर 20 ते 30 सेकंद विराम घ्यावा. आणि पुन्हा एक मिनिट लावून उड्या माराव्यात. दोरीवरच्या उड्या हा सगळ्यात सोपा कार्डिओ व्यायाम मानला जातो, जो कुठेही आणि केव्हाही करता येणं शक्य आहे.
जिने चढणे-उतरणे
जिने चढणे उतरणे हा काय व्यायाम आहे का? असा अनेकांना प्रश्न पडतो पण फिटनेस तज्ज्ञांच्या मते हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे. व्यायाम म्हणून जिने चढल्या उतरल्यास उष्मांक आणि शरीरातील चरबी कमी होते. जिने चढताना स्नायूंचा वापर अधिक होतो. यामुळे पाय मजबूत होतात आणि शरीरावर जमा झालेली चरबी कमी होते. कमी वेळात वेगाने वजन कमी करण्यासाठी रोज 10 ते 15 वेळा जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम करायला हवा.
पोहोणे
पोहोणे हे एक कौशल्य आहे आणि व्यायामही. पण सर्व कार्डिओ व्यायाम प्रकारात पोहोणे हा व्यायाम उत्तम समजला जातो. कारण पोहोतांना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहोताना अधिक गुरुत्वीय शक्ती लागते. त्यामुळे स्नायुंवर जास्त ताण येतो. त्यांना जास्त काम करावं लागतं. एक मिनिट वेगानं पोहोल्यास 14 उष्मांक जळतात. वजन वेगानं कमी करायचं असेल तर पोहोणं शिकून तो व्यायाम रोज करावा.