सोमवारचा दिवस मलायका अरोरा (Malaika Arora) आणि तिचे फिटनेस फ्रिक चाहते यांच्यासाठी खास असताे. कारण या दिवशी मलायका तिच्या चाहत्यांना हेल्थ, फिटनेस याबाबत monday motivation देत असते. यावेळीही मलायकाने इन्स्टाग्रामवर (instagram post) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने करून दाखवलेले योगासनांचे प्रकार खरोखरंच खूप अवघड असून वयाची पंचेचाळिशी ओलांडल्या नंतरही मलायका अशी अवघड आसनं कशी काय करू शकते, असा प्रश्न बघणाऱ्याच्या मनात नक्कीच येतो...
तिची ही आसनं पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर मलायकानेच दिलं आहे. ती सांगते की सातत्य हे तिच्या या फिटनेसचं सिक्रेट आहे.. Consistency is the secret. Nothing else.. असं तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. इथेच तर नेमकं आपलं घोडं अडतं आणि म्हणूनच आपण आपला फिटनेस मेंटेन करू शकत नाही. वर्षाच्या सुरुवातीला किंवा एखाद्या दिवशी आपल्या मनात येतं की आपण दररोज व्यायाम केला पाहिजे.. पण हा आपला संकल्प किंवा निश्चय इतका डळमळीत होतो की एखाद्या महिन्याच्या पुढे आपली ही गाडी जाऊ शकत नाही..
या पोस्टमध्ये मलायका म्हणते आहे की दररोज तुम्ही काही ना काही व्यायाम निश्चितच केला पाहिजे. कारण हा व्यायाम तुम्हाला शारिरिक दृष्ट्या तर फिट ठेवतोच, पण तुमचं मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य उत्तम राखण्यासाठीही व्यायामाची खूप मदत हाेते. त्यामुळेच तर मलायकासारखा फिटनेस आणि फिगर हवी असेल, तर दररोज स्वत:साठी काही मिनिटं राखून ठेवता आलीच पाहिजेत आणि त्यानुसार वर्कआऊट केलेच पाहिजे..
सेतू बंधासन (setu bandhasana)
या पोस्टमध्ये मलायकाने जे पहिले आसन केले आहे त्या आसन अवस्थेला सेतू बंधासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी अवघड आहे आणि त्यासाठी तुमची फिटनेस पातळी चांगली असणे गरजेचे आहे. या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था एखाद्या पुलाप्रमाणे म्हणजेच सेतू प्रमाणे होते. त्यामुळे याला सेतू बंधासन म्हणतात. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा. यानंतर तळपाय आणि डोके हे जमिनीवर ठेवून शरीराचा अन्य भाग उचलण्याचा प्रयत्न करा. हाताने पाठीला आधार द्या. शरीर उचलले गेले की गुडघ्यात वाकवलेले पाय सरळ करा.
सेतू बंधासन करण्याचे फायदे
- छाती, मान आणि पाठीचा कणा याठिकाणच्या स्नायुंना बळकटी मिळते.
- पचन आणि चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे शरीरारील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत हाेते.
- एंझायटी, मानसिक तणाव किंवा निद्रानाश असा त्रास कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
- थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना हे आसन करणे फायदेशीर ठरते.
- फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.