Join us  

व्यायामानंतर दणकून भूक लागते म्हणून वाट्टेल ते खाता ? वाढेल वजन, बघा व्यायामानंतर काय खायचं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 9:00 AM

What to Eat Before & After a Workout : वर्कआऊटआधी व नंतर आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो, तेव्हा नेमकं काय खावं ते पाहूयात...

फिट अँड फाईन दिसण्यासाठी सगळेचजण प्रयत्न करतात. योग्य एक्सरसाइज व अचूक डाएट यांच्या मदतीने आपण फिट राहू शकतो. एक्सरसाइज करण्यासाठी आपण जिम, योगा किंवा काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी तर करतो. परंतु हे वर्कआऊट करण्याआधी आणि केल्यानंतर नेमकं काय खावं हा एक कॉमन प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. खरंतर, वर्कआऊट आधी आणि नंतर आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो. योग्य आणि अचूक खानपानाशिवाय देखील वर्कआऊट करुन त्याचा काहीच फायदा होत नाही(What to Eat Before & After a Workout).

वर्कआऊट करण्यापूर्वी आपण जे काही खातो त्यावर आपली वर्कआऊट करण्याची क्षमता व वर्कआऊट दरम्यानची ऊर्जा अवलंबून असते. त्याचबरोबर वर्कआऊट केल्यानंतरही आपण जे काही खातो त्याला फार महत्व असते. वर्कआऊटआधी आणि नंतर जर आपण काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एक्सरसाइज करण्यापूर्वी आणि नंतर नेमकं काय खावं, हे पाहूयात. 

एक्सरसाइज करण्यापूर्वी आणि नंतर नेमकं काय खावं ?

१. कार्बोहायड्रेट्स महत्वाचा स्रोत :- 

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, एक्सरसाइज दरम्यान कार्बोहायड्रेट्स हा एक महत्त्वाचा ऊर्जा स्त्रोत आहे. एक्सरसाइज करताना ऊर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता ही आपल्या स्नायूंवर अवलंबून असते. अशा स्थितीत एक्सरसाइजपूर्वी आणि नंतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने ऊर्जा मिळते. स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि वाढीसाठी एक्सरसाइजनंतर आपण पुरेसे प्रोटीन देखील घेऊ शकता.

२. एक्सरसाइज करण्यापूर्वी काय खावे :- 

एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी सुमारे ३० ते ६० मिनिटे आधी हलका आणि कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता खाणे आवश्यक आहे. नाश्ता जास्त हेव्ही नसून सहज पचेल असा असावा. एक्सरसाइजपूर्वी नाश्त्यात जास्त फायबर असलेला कोणताही पदार्थ घेणे टाळावे, अन्यथा पोट खराब होऊ शकते. केळी, बेरी,दही, ग्रॅनोला आणि जॅम किंवा बटरसोबत टोस्ट आणि स्मूदी हे एक्सरसाइज पूर्वीचे उत्तम स्नॅक्स पर्याय आहेत.

चक्रासनाने तब्येत कायमची ठणठणीत होते, पण ४ चुका टाळा - नाहीतर पाठीचे दुखणे जन्मभर छळेल...  

३. एक्सरसाइज केल्यानंतर काय खावे :- 

एक्सरसाइजनंतर लगेच १५ ते २५ ग्रॅम प्रोटीन खाल्ल्याने शरीर उर्जेचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. यामुळे कमी कॅलरीज बर्न होतात. स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि दुरुस्तीसाठी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन यांचे गुणोत्तर ३:१ असे असावे. एक्सरसाइजनंतर आपण फळे, चीज, भाज्या यापैकी कोणताही एक पदार्थ खाऊ शकता. 

४. हायड्रेशन देखील तितकेच महत्वाचे :- 

व्यायाम करताना हायड्रेटेड राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. वर्कआऊटच्या आधी, दरम्यान आणि नंतर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन आणि उन्हाळ्यातील आजारांचा धोका कमी होतो.

५. हाय इंटेंसिटी वर्कआऊट करताना काय खावे :-

जर आपण हाय इंटेंसिटी किंवा तासाभरापेक्षा जास्त वेळ एक्सरसाइज करणार असाल तर त्यादरम्यान आपण कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात काहीही खाऊ किंवा पिऊ शकता. २.५ तासांच्या व्यायामासाठी दर तासाला ३० ते ६० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेणे योग्य ठरते. एक्सरसाइज नंतर प्रोटीन घेणे देखील तितकेच महत्वाचे असते, पण जर आपण एकाचवेळी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटिन्स खाल्ले आणि तेवढा व्यायाम केला नाही तर वजन वाढण्याची शक्यता वाढू शकते.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स