आजच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांना आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं ही काळाची गरज झाली आहे. पण फिटनेसकडे लक्ष देणं म्हणजे आंधळेपणानं कोणताही व्यायाम करणं असं नव्हे. तर आपल्या शरीरासाठी कोणता व्यायाम महत्त्वाचा आहे हे समजून तसा व्यायाम करणं गरजेचं असतं. पण फिटनेस तज्ज्ञ म्हणतात की आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजांनुसार व्यायाम प्रकार निवडणं महत्त्वाचं आहेच पण सोबतच सर्वच महिलांनी आपल्या रोजच्या व्यायाम प्रकारात कोअर एक्सरसाइज करणंही आवश्यक आहे. छाती, पाठ, कंबर, ओटीपोट, पोट हे अवयव जर मजबूत ठेवायचे असतील तर कोअर एक्सरसाइजशिवाय पर्याय नाही. हे अवयव, आणि त्यांचे स्नायू आपल्या रोजच्या बारीक सारीक हालचालीत वापरले जातात. कोअर एक्सरसाइजमुळे महिलांना हालचाली करण्यास, रोजची कामं विनासायास करण्यास सुलभ होतं.
छायाचित्र- गुगल
ट्रांसवर्स एब्डोमिनिस मसल्स हा स्नायूचा समूह मजबूत आणि सक्रीय ठेवण्यासाठी कोअर एक्सरसाइज महत्त्वाच्या असतात. हे स्नायू समूह पाठीच्या खालच्या बाजूस असतात आणि छाती, पोट, पाठ, ओटीपोट यांना आधार देतात.
जर ट्रांसवर्स एब्डोमिनिस मसल्स अशक्त असतील , सक्रीय नसतील तर महिलांमधे कंबरदुखी होते. पण तेच जर मजबूत असतील तर ते छाती, पोट, पाठ, ओटीपोट या अवयवांची आतून ताकद वाढवतात, त्यांचं रक्षण करतात. पाठीचा कण ताठ राहातो.
छायाचित्र- गुगल
महिलांमधे हा स्नायुंचा समूह बरगड्या आणि ओटीपोटाच्य मध्यभागी समोरुन आणि मागून असतात. हे स्नायू जर मजबूत नसतील तर पोटाच्या स्नायुंवर भार पडतो. कंबरदुखीचा त्रास सुरु होतो आणि तो कायमस्वरुपी राहातो. हे स्नायू समूह सक्रीय असतील तर बाळंतपणानंतर महिलांचं वाढलेलं वजन कमी होतं. हा स्नायू समूह सक्रीय आणि मजबूत होण्यासाठी ओटीपोटाचा तळ यालाच पेल्विक फ्लोर असं म्हणतात तो मजबूत असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी फिटनेस तज्ज्ञ महिलांना एल सीट हा व्यायाम प्रकार करण्याचा सल्ला देतात. याशिवाय प्लॅंक, साइड प्लॅंक, क्रंच एक्सरसाइजेस, चेअर एक्सरसाइज, ओटीपोटाचे व्यायामही आहेत. पण यातलं काहीच करायला जमलं नाही तरी रोजच्या व्यायामासोबत महिलांनी एल सीट व्यायाम जरुर करावा असं तज्ज्ञ म्हणतात.
एल सीट व्यायाम कसा करावा?
जमिनीवर पाय लांब करुन ताठ बसावं. दोन्ही झात जमिनीवर सरळ ठेवावेत. दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय जमिनीला समांतर राहातील असे उचलावेत. या स्थितीत शरीराचा एल सारखा आकार होतो म्हणून या व्यायामाला एल सीट व्यायाम असं म्हणतात. या स्थितीत झेपेल तितक्या वेळ राहावं. श्वास सोडत सावकाश पाय जमिनीला टेकवावेत. असे किमान दहा वेळा तरी करावं. यामुळे ओटीपोटाचा तळ अर्थात पेल्विक फ्लोर मजबूत होतो.