गौरी पटवर्धन
“कसली फिट आहे ना ती…” असं आपण एखादीकडे बघून हेव्याने म्हणतो तेव्हा आपल्याला ‘तिच्यात’ नेमकं काय दिसलेलं असतं? कशामुळे ती आपल्याला ‘फिट’ आहे असं वाटतं? असा प्रश्न विचारला तर १००पैकी ८० जणी उत्तर देतील की ती बारीक आहे.कोणी कबूल करो अथवा न करो, आपल्या आत्ताच्या वजनातून ५-१०-१५-२० किलो कमी झाले तर किती छान होईल हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात, किंवा निदान अंतर्मनात तरी असतोच. बरं, आपण ते ५-१०-१५-२० किलो कमी असतांना कसे दिसायचो हे आपल्याला नीटच आठवत असतं. त्यामुळे आपण तेवढं वजन कमी केल्यावर कसे दिसू हे आपल्याला माहिती असतं. म्हणूनच त्या आपल्या मनात असलेल्या आपल्या आयडियल फिगरच्या जवळ जाणारी कोणीही स्त्री दिसली की आपण म्हणतो, “कसली फिट आहे ना ती…”खरं म्हणजे आपल्याला त्यावेळी फक्त बारीक म्हणायचं असतं. पण फक्त बारीक म्हणजे फिट का? हे ठरवण्यासाठी आधी फिटनेस म्हणजे काय हे नीट समजून घेतलं पाहिजे. फिटनेसच्या अनेक व्याख्या असू शकतात. त्यात विविध पॅथींचे डॉक्टर, आहारतज्ज्ञ इत्यांदींची मतं वेगवेगळी असू शकतात.
पण आपण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून विचार केला तर फिटनेस म्हणजे काय?
शरिराची अशी अवस्था ज्यात आपल्याला रोजचं आयुष्य जगण्यात आणि त्याव्यतिरिक्त काही शारीरिक श्रमाचे कष्ट करण्यात अडचणी येत नाहीत. ही व्याख्या अर्थातच वयाप्रमाणे बदलते. पण निदान चाळिशीपर्यंत तीन चार जिने सहज चढता येणं, दहा बारा किलो भाजी किंवा किराणा एखाद्या किलोमीटरवरून उचलून आणता येणं, स्टूलवर चढून पाच सात किलोचे डबे वरच्या मांडणीवर ठेवता/काढता येणं, रोजची घरातली आणि ऑफिसची कामं केल्याने प्रचंड थकवा न येणं, कानातल्याची पलंगाखाली घरंगळत गेलेली फिरकी वाकून काढता येणं असे काही निकष आपण फिटनेस ठरवतांना वापरू शकतो. आपल्यापैकी अनेकींना यातल्या एक किंवा एकाहून अधिक गोष्टी करता येतात. पण बहुतेक सगळ्या जणींना यातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. असं का होतं?
हे सगळे निकष परत वाचले तर आपल्या असं लक्षात येतं, की यात फिटनेस किंवा शारिरीक तंदुरुस्तीचे वेगवेगळे पैलू लागतात. यातल्या काही कृती करायला ताकद लागते, काहींसाठी दमसास किंवा स्टॅमिना लागतो, काहींसाठी बॅलन्स आणि स्नायूंचं कोऑर्डिनेशन लागतं, तर काहींसाठी लवचिकपणा लागतो. याचाच अर्थ असा, की ज्या व्यक्तीकडे ताकद, स्टॅमिना, बॅलन्स आणि लवचिकपणा हे सगळे गुण असतात, ती व्यक्ती फिट असते. आणि अशी सर्व अर्थाने फिट असणारी व्यक्ती बहुतेक वेळा बारीक असतेच. पण बारीक असणारी व्यक्ती फिट असेलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे अत्यंत शिडशिडीत मुलीला जर का दोन जिने चढून धाप लागत असेल आणि चार किलो समानसुद्धा उचलता येत नसेल, तर ती नुसतीच बारीक असते. फिट नसते. त्यामुळे बारीक असण्यापेक्षा फिट असणं महत्वाचं!पण मग प्रश्न असा येतो की हा फिटनेस कमवायचा कसा?
त्याविषयी पुढच्या भागात ..