लठ्ठपणा ही सध्या वाढती समस्या आहे. मात्र यातही अनेकदा आपल्या शरीराच्या ठराविक भागातच चरबी वाढलेली दिसते. प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगवेगळी असल्याने शरीरावरील चरबी वाढण्याचे ठिकाण वेगवेगळे असू शकते. कोणाचे फक्त पोटच खूप वाढते तर कोणाची कंबर. काही जणांचे जाड झाले की दंडाचा भाग खूप मोठा दिसतो तर काही जणांचा मांड्यांचा भाग अचानक वाढतो. शरीराच्या ठराविक भागातील चरबी वाढली की आपण बेढब दिसायला लागतो.
महिलांमध्ये अशाप्रकारे मांड्यांच्या भागात चरबी वाढण्याचे प्रमाण जास्त असते. शरीरात अॅस्ट्रोजनचे प्रमाण वाढल्याने ही चरबी वाढते. मांड्यांवर वाढलेली ही चरबी कमी करण्यासाठी आपण व्यायाम, डाएट असे सगळे करतो पण काही केल्या ही चरबी कमी व्हायचं नाव घेत नाही. मात्र नियमीतपणे काही आसनं केल्यास ही वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे पायाच्या, मांडीच्या आणि पृष्ठभागाच्या स्नायूंना ताण पडतो आणि ते कमी होण्यास सुरुवात होते, पाहूयात ही आसनं कोणती...
१. उत्कटासन
या आसनामध्ये दोन्ही हात समोर जमिनीला समांतर घ्यायचे. पायाच्या टाचा वर उचलून गुडघ्यातून खाली बसायचे. पुन्हा वर उठून पुन्हा खाली बसायचे. यामुळे मांड्यांच्या स्नायूंना ताण येतो आणि मांड्यांवरल वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीराचे वजन तुमच्या मांड्यांवर येत असल्याने मांड्यांच ताकद वाढते आणि चरबी कमी होते. मात्र त्यासाठी हे आसन नियमीतपणे करायला हवे. सुरुवातीला कमी सेकंद करुन नंतर हे आसन जास्त काळ टिकवायला हवे.
२. वीरभद्रासन
दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घेऊन दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत जमिनीला समांतर ठेवावेत. उजव्या पायाचे पाऊल उजव्या दिशेला वळवून कंबरेतून थोडे उडवीकडे वळावे. मांडीतून खाली वाकून पुन्हा वर यावे. असे दोन्ही बाजूला जास्तीत जास्त वेळा करावे. या आसनामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच मांडीच्या आतील स्नायूंना ताण पडत असल्याने हे आसन नियमीत केल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे कंबरेच्या खालील भागालाही ताण पडत असल्याने याठिकाणी वाढलेली चरबीही कमी होण्यास मदत होते.
३. नौकासन
नौकासन हे आसन अनेक समस्यांवरील एक उत्तम आसन आहे हे लक्षात घ्यायला हवे. नौकासनामुळे पोट, पाठ, मांड्या, खांदे अशा सर्वच ठिकाणी ताण पडतो. त्यामुळे याठिकाणचे स्नायू ताणले जाऊन चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. दोन्ही पाय कंबरेतून वर उचलून दोन्ही हात पायाच्या दिशेला समांतर ठेवावेत. यामुळे संपूर्ण शरीर हे पृष्ठभागावर तोलले जाते. हे आसन नियमित केल्यास पोटाचे स्नायू बळकट होण्यासही मदत होते.