Join us  

काम करता करता अचानक एनर्जी लेव्हल डाऊन होते? करा फक्त १ गोष्ट, राहाल एकदम फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2023 1:43 PM

How To get Energy when we feel Low : थकवा वाटत असेल तर काम अर्धवट सोडून देण्यापेक्षा नियमित १ गोष्ट केल्यास निश्चित फायदा होतो...

आपण घरातलं किंवा ऑफीसचं काम करत असतो आणि अचानक आपल्याला डाऊन वाटायला लागतं. एकाएकी अंगात काहीच ताकद नाहीये किंवा काहीच करु नये असं वाटतं. अशावेळी आपण एकतर ब्रेक घेतो आणि चहा किंवा कॉफी पितो नाहीतर स्वत:ला तसंच रेटून काम करत राहतो. पण मग एक वेळ अशी येते की आपल्याला पुढे काहीच करवत नाही आणि घरी निघून जावसं किंवा चक्क झोपून राहावसं वाटायला लागतं. असं होण्यामागे बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात. शरीरात काही घटकांची असणारी कमतरता, आहारातून होणारे अपुरे पोषण, प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक किंवा मानसिक श्रम यांचा यामध्ये समावेश असू शकतो. आता असे झाल्यावर काम अर्धवट सोडून देण्यापेक्षा १ सोपा उपाय केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया (How To get Energy when we feel Low)...

थकल्यासारखे वाटल्यास जरुर करा..

थकवा आल्यासारखे वाटल्यास कमी झालेली एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्ट लवलिन कौर काही टिप्स सांगतात. त्या म्हणतात दिवसभरातून २ मिनीटे वेळ काढून श्वसनाचे व्यायाम करायला हवेत. त्यामुळे आपली थकवा येण्याची समस्या नक्कीच दूर होऊ शकते. आता श्वसनाचे व्यायाम करायचे म्हणजे नेमके काय करायचे याविषयी समजून घेऊया...

१. सगळ्यात आधी एखाद्या शांत ठिकाणी बसून घ्या.     

२. मग डोळे बंद करुन एकदम शांत होण्याचा प्रयत्न करा.

३. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 

४. आता ४ सेकंद हवा आत घ्या, ४ सेकंद होल्ड करुन ठेवा आणि ६ सेकंदाने हवा बाहेर सोडा. 

५. दिवसभरातून शक्य तितक्या वेळा हा व्यायामप्रकार कराल तर नकळत तुमची एनर्जी लेव्हल वाढेल आणि फोकस करणे सोपे होईल. 

६. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि निर्णयक्षमता सुधारण्यासाठीही याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

७. याबरोबरच भरपूर झोप, व्यायाम, संतुलित आहार या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे.  

टॅग्स :फिटनेस टिप्सलाइफस्टाइलआरोग्य