Join us  

पोट सारखं फुगल्यासारखं वाटतं? करीना-आलियाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपी आसनं, १० मिनीटांत मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2023 10:07 AM

How To Get Relief from Bloating : नियमितपणे ५ आसनं केल्यास पोट फुगण्याची समस्या कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो.

पोट फुगणे, अपचनामुळे अस्वस्थ वाटणे, गॅसेसच्या समस्या उद्भवणे अशा एक ना अनेक गोष्टींमुळे आपण हैराण असतो. अॅसिडीटी, करपट ढेकर येणे, बद्धकोष्ठता अशा पचनाशी निगडीत एक ना अनेक समस्या उद्भवतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली यामुळे प्रामुख्याने पोटाच्या तक्रारी उद्भवतात. अपुरी झोप, जास्त प्रमाणात फायबर असलेले पदार्थ, शरीरात पाण्याची पातळी कमी राहणे, अनियमित पाळीयांसारख्या कारणांनी पोटाच्या तक्रारी उद्भवतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि आलिया भट यांची फिटनेसतज्ज्ञ असलेल्या अंशुका परवानी यांनी यासाठीच काही सोपे उपाय आपल्याशी शेअर केले आहेत. नियमितपणे ५ आसनं केल्यास पोट फुगण्याची समस्या कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो. आता ही आसनं कोणती आणि ती कशी, किती वेळा करायची यासंबंधी माहिती घेऊया (How To Get Relief from Bloating)...

१. कटी चक्रासन 

दोन्ही पायात अंतर घेऊन कंबरेतून दोन्ही बाजूला गोलाकार फिरावे. म्हणजे पोटाच्या आजुबाजूचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. सुरुवातीला दोन्ही बाजूला प्रत्येकी १० वेळा गोल वळावे हळूहळू ही वेळ किमान २ मिनीटांपर्यंत वाढवत न्यावी. 

२. उत्थित पार्श्वकोनासन 

दोन्ही पायात पुरेसे अंतर घेऊन एक पाय जमिनीला समांतर ठेवावा आणि गुडग्यात वाकावे. एक हात गुडघ्यावर ठेवून दुसरा हात कानाच्या रेषेत सरळ ठेवावा. सुरुवातीला १५ ते २० सेकंद करावे. हळूहळू २ मिनीटांपर्यंत वेळ वाढवत न्यावी. 

३. मंडुकासन

अंगठा हातावर दुमडून घेऊन मग बोटं त्यावर ठेवून हाताची मूठ करावी. मांड्यांच्या सुरुवातीला म्हणजेच पोटाच्या खालच्या बाजूला या दोन्ही मुठी ठेवाव्यात आणि कंबरेतून खाली वाकून डोकं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. 

४. सेतू बंधासन 

पाठीवर झोपावे आणि दोन्ही पावले नितंबांना टेकतील अशी फोल्ड करुन जमिनीवर समांतर ठेवावीत. कंबरेचा भाग उचलून शरीराचा भार खांदे, मान, डोकं आणि पावलांवर उचलण्याचा प्रयत्न करावा. हे आसनही १५ ते २० सेकंद करुन नंतर २ मिनीटांपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करायचा.

५. पवनमुक्तासन

पोटात गॅसेस झाले असतील तर ते बाहेर पडावेत म्हणून हे आसन आवर्जून करायला हवे. दोन्ही पाय फोल्ड करुन पोटावर दाब घेण्याचा प्रयत्न करावा. पोटावर दाब आल्याने गॅसेस बाहेर पडणे सोपे होते. गॅसेसमुळे पोटफुगीची समस्या उद्भवली असेल तर यामुळे आराम मिळण्यास मदत होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स