Join us  

चेहऱ्याला वरवर क्रिम्स चोपडून काय उपयोग? चाळिशी उलटल्यावरही विशीतलं रुप हवं, डॉक्टर सांगतात ‘एवढं’ करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 5:15 PM

How to look young at the age of forty : योग्य आयुर्वेदिक उपचार आणि जीवनशैलीच्या माध्यमातून चाळीशीतही सौंदर्य टिकवणे शक्य आहे.

डॉ. पौर्णिमा काळे

आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ

वयाच्या चाळीशीत प्रवेश करताना शरीरात आणि त्वचेत अनेक बदल होतात. आयुर्वेदानुसार, या वयात दोषांचे (वात, पित्त, कफ) असंतुलन होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. योग्य आयुर्वेदिक उपचार आणि जीवनशैलीच्या माध्यमातून चाळीशीतही सौंदर्य टिकवणे शक्य आहे. आयुर्वेद बाह्य सौंदर्याच्या जोडीने आंतरिक तेजाला महत्त्व देतो ज्यासाठी शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणे आवश्यक असते (How to look young at the age of forty).

१. आहार

आहार हा आयुर्वेदानुसार सौंदर्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्रिदोष संतुलित आहार शरीरातील दोष नियंत्रित ठेवतो, ज्यामुळे सौंदर्य वृद्धिंगत होते. वात, पित्त, आणि कफ दोष संतुलित ठेवण्यासाठी तूप, ताजे आणि गोड अन्न पदार्थांचा समावेश असावा. वातशामक पदार्थ, गाईचे तूप आणि ताजी फळं आहारात घ्यायला हवीत. तूप त्वचेला पोषण देऊन तिचा मऊपणा आणि तजेलपणा राखते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी चे गुण त्वचेला आणि केसांना पोषण देतात. नियमित आवळ्याचा रस घेतल्यास त्वचा तेजस्वी होते.

२. त्वचा आणि केसांची काळजी

सौंदर्य टिकवण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर प्रभावी ठरतो. मसूर डाळ आणि दूध एकत्र करून तयार केलेला फेसपॅक त्वचेचा रंग उजळवतो आणि चेहरा ताजातवाना दिसतो. रोज सकाळी चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचा मऊ आणि तेजस्वी होते.दूध त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायजिंग करते. आठवड्यातून दोन वेळा बेसन, हळद आणि गुलाबपाण्याचा वापर करून चेहऱ्यावर उटणं लावल्यास त्वचा स्वच्छ आणि सतेज राहते. झोपताना चेहऱ्यावर ६ थेंब कुमकुमादी तेलाने मालीश करावी. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा उजळते.आठवड्यातून ४ वेळा तरी २० मिनिटे चेहऱ्याचा व्यायाम (फेस योगा) करावा. यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना ताकद मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते. चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावल्याने त्वचेचा मऊपणा टिकतो आणि पिंपल्सवरही नियंत्रण मिळवता येते. पपई, केळं, संत्रे इत्यादी फळांचा पल्प तयार करून चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते आणि चेहऱ्यावरचा तेजस्वीपणा वाढतो.

३. दोष संतुलित ठेवण्यासाठी दिनचर्या

योग्य दिनचर्या आणि तणावमुक्त जीवनशैली सौंदर्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. चाळीशीत तणाव वाढल्यामुळे सौंदऱ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान हे तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि मन शांत राहिल्यामुळे सौंदर्य टिकते.

४. पंचकर्म आणि शरीरशुद्धी

आयुर्वेदात पंचकर्म उपचाराद्वारे दोषांचे शुद्धीकरण करून शरीराचे सौंदर्य आणि आरोग्य राखले जाते. नस्य कर्माद्वारे चेहऱ्याचे दोष नियंत्रित राहतात आणि त्वचा तेजस्वी होते. रोज २-२ थेंब कोमट साजूक तुपाचे सोडावे.

५. केसांसाठी ब्राह्मी आणि भृंगराज तेल 

आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी ब्राह्मी, भृंगराज आणि आवळा यांचे तेल उपयुक्त मानले जाते. हे तेल केसांना पोषण देते. केसगळती थांबण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठी या तेलांचा चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

६. सौंदर्य टिकवण्यासाठी रसायन (पुनरुत्पादक औषधी) चा वापर 

१. च्यवनप्राश: च्यवनप्राश हे एक रसायन आहे, जे शरीराला बलवान, तरुण आणि त्वचेला तेजस्वी ठेवण्यास मदत करतो. रोज एक चमचा च्यवनप्राश घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्वचेला आतून पोषण मिळते.

२. आवळा: आवळा हे एक अत्यंत गुणकारी फळ आहे, जे केसांसाठी आणि त्वचेसाठी उत्तम आहे. त्यात विटामिन  सी असल्यामुळे केस मजबूत होतात आणि त्वचेची चमक वाढते. आवळ्याचा रस किंवा पावडर नियमितपणे घेतल्यास सौंदर्य टिकते.

३. शतावरी: शतावरी ही एक उत्तम औषधी आहे, चाळीशीतील महिलांसाठी शतावरीचे सेवन लाभदायक ठरते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यब्यूटी टिप्स