फिट रहायचं असेल, फिटनेस वाढवायचा असेल तर व्यायामाला पर्याय नाही, हे आपण सगळेच जाणतो. व्यायामाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच कळतं. पण तरीही प्रत्येक जण व्यायाम करतोच असं नाही. कळतं पण वळत नाही, हे याबाबतीत अनेकांचं होतं... आम्हाला व्यायाम करायला वेळच नाही, असंही अनेक जणांचं म्हणणं असतं. यात काही जणांच्या अडचणी खरोखरंच खूप स्वाभाविक असतात. तर काही जण मात्र व्यायाम टाळण्यासाठी फक्त वेळेचं कारण, निमित्त पुढे करत असतात. (how to improve fitness without exercise)
व्यायामाला वेळ नाही, असं सांगणाऱ्या सगळ्यांसाठी या ५ गोष्टी नक्कीच उपयोगी पडू शकतात. नियमित व्यायाम करता, पण काही कारणाने जर व्यायामाचा कंटाळा आला किंवा काही कारणांमुळे नियमित व्यायाम करणं शक्य नसेल पण वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल, तर अशा सगळ्यांसाठीच हे पर्याय उपयुक्त ठरू शकतात.. कारण शेवटी काय तर फिट रहायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर योग्य माध्यमातून तुमची काहीतरी शारिरीक हालचाल होणं गरजेचं असतं. म्हणूनच तर या लेखात आपण जाणून घेऊया की व्यायाम न करताही वजन कसं कमी करता येतं, याचे काही खास उपाय.
१. गाडी दूर पार्क करा..
ऑफिस, घर, मॉल किंवा मार्केट असं कुठेही गेलं तरी आपला एकच प्रयत्न असतो की त्या ठिकाणाच्या जास्तीत जास्त जवळ गाडी लावायची. जेणेकरून चालायचं अंतर कमी होतं आणि अगदी गाडीतून उतरल्याबरोबर काही पावलं चालूनच आपण आपल्या अपेक्षित स्थळी पोहोचू शकतो. व्यायाम नसेल करायचा तर या सवयीत बदल करा. तुमच्या ठिकाणापेक्षा दूर गाडी पार्क करा आणि चालत जा. ५ ते १० मिनिटांच्याच अंतरावर जायचं असेल तर सरळ गाडी नेणं टाळा.
२. भटकंती करा..
फिरण्याची आवड असेल तर प्रत्येक सुट्टीच्या दिवशी हा उपक्रम राबवाच. थोडंसं शहराच्या बाहेर पडून मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करा. सायकलवर जा, पायी जा किंवा मग गाडी घेऊन जा. पण गावाबाहेर गाडी पार्क करून काही वेळ चालत चालतच मस्त सैर करून या. भटकंतीची आवडही पुर्ण होईल आणि चालण्याचा फायदाही होईल.
३. मुलांसोबत खेळा..
हा देखील खूप चांगला व्यायाम होऊ शकतो. अर्थातच यासाठी तुम्हाला मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडावे लागेल. मुलं लहान असतील तर सरळ त्यांना बाबागाडीत किंवा सायकलमध्ये बसवा आणि दूर चक्कर मारून या. मोठ्या मुलांसोबत बॅडमिंटन, क्रिकेट खेळा. मुलांसोबत तुम्ही रनिंग, वॉकिंग, सायकलिंगही करू शकता. यामुळे तुम्हाला फक्त शारिरीकच नाही तर मानसिक, भावनिक फिटनेसही मिळेल. एरवी मुलांसोबत घालवायला वेळ मिळत नाही, त्यामुळे हा पर्याय चांगला ठरेल. मुलेही खुश होतील.
४. लंचब्रेक, टी ब्रेकचा उपयोग करा..
वर्किंग असाल तर ऑफिसमधल्या लंचब्रेकचा टी ब्रेकचा चांगला उपयोग करता येईल. जेवण झालं किंवा चहा- कॉफी घेऊन झालं की त्याच जागेवर बसून गप्पा मारण्यापेक्षा ऑफिसच्या गार्डनमध्ये, रिकाम्या पोर्चमध्ये किंवा कॅम्पसमध्ये वॉकिंग करा.