अभिनेत्री सारा अली खान. एकेकाळी तिचंही वजन खूप होतं. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने ४० किलो वजन कमी केलं. तिचा हा वेटलॉस प्रवास प्रेरणादायी आहे. तिचे जुने फोटो देखील खूप व्हायरल होत असतात. मात्र, साराने कधी तिच्या आधीच्या फोटोंबाबत अथवा दिसण्याबाबत संकोच बाळगला नाही. तिने वेळोवेळी तिचा अनुभव शेअर केला आहे.
वजन कमी करण्यासाठी साराच्या आईनेच तिला प्रोत्साहित केले. तिला तिच्या आईसारखे सुंदर आणि उत्तम अभिनेत्री बनायचे होते. यासाठी तिने मनाशी ठरवलं आणि स्वतःला उभारण्याचा प्रयत्न सुरू केला. या सगळ्यात सारा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) या हार्मोनच्या संबंधित समस्येला सामोरी जात होती. ज्यामध्ये वजन कमी करणे कठीण जाते. तरी देखील तिने जिद्द ठेवत वजन कमी केले.
कॉलेजमध्ये असताना साराचे वजन ९६ किलो झाले होते. तिने यासंदर्भात एका मुलाखतीत सांगितले होते की, "जेव्हा माझी आई अमृता सिंग विमानतळावर घेण्यासाठी आली तेव्हा ती मला ओळखू शकली नाही. कारण वजन खूप वाढले होते. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी वर्कआऊटला सुरुवात केली. मी ठरवले होते की जोपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत आईला व्हिडिओ कॉलवर आपला चेहरा दाखवणार नाही".
वजन घटवण्यासाठी तिनं कीटो डाएटची मदत घेतली होती. पण यामुळे तिला फारशी मदत झाली नाही. यासाठी तिनं नियमित पौष्टिक आहाराचं सेवन करण्यास सुरुवात केली. वजन करणं अजिबात सोपी गोष्ट नाही, असं सारा कित्येकदा आपल्या मुलाखतीत सांगते.
पिझ्झा ऐवजी सॅलड
वजन कमी करण्यासाठी साराने प्रथम दोन पर्याय निवडले. पहिला जंक फूड सोडून निरोगी आहाराचे सेवन करण्यास सुरुवात केले. तिने तिच्या आवडत्या पदार्थांचा कायमचा निरोप घेतला. पिझ्झा, चॉकलेट, आईस्क्रीमसारख्या खाद्यपदार्थ सोडून तिने सॅलड खायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे वर्कआऊटसह साराने टेनिस खेळायला सुरुवात केली.
प्रमाणाबाहेरील वर्कआउट्सचेही आहेत तोटे
साराच्या मतानुसार स्वत:साठी फार कडक डाएट ठेवणे योग्य नाही. फिल्मफेअर दरम्यान तिने सांगितले होते की, "खूप जास्त वर्कआउट करणे देखील चांगले नाही, जेव्हा सुरुवातीला ७ दिवस वर्कआउट करून वजन कमी झाले न्हवते. तेव्हा पर्सनल ट्रेनर नम्रता पुरोहितने ६ दिवस वर्कआउट करण्याचा सल्ला दिला. यासह चिट डेला देखील सुरुवात केली होती". वजन कमी करण्यासाठी एकाग्र महत्त्वाची असं सारा म्हणते.