एकीकडे आपल्याला व्यायाम करायला वेळ मिळत नाही आणि दुसरीकडे मात्र ऑफिस, वर्क फ्रॉम होम यामुळे तासनतास बसून काम करण्याचे तास मात्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळेच वजन वाढण्याचा त्रास अनेक जणांना होतो आहे. यातही मुख्यत: बैठ्या कामामुळे हिप्स फॅट वाढत चालले आहेत, ही तक्रार अनेकांची आहे. म्हणूनच तुमच्या दररोजच्या रुटीनमधून फक्त १० मिनिटांचा वेळ काढा आणि हिप्स फॅट (How to reduce hips fat) कमी करून कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे काही सहज, सोपे व्यायाम करा.
हिप्स फॅट कमी करण्यासाठी योगासने...(yoga for reducing hips fat)
ही योगासने केल्यामुळे हिप्स फॅट तर कमी हाेईलच पण मांडी, कंबर, पोटरी याठिकाणचे फॅट्सदेखील कमी होतील. इंचेस लॉस होऊन परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी ही योगासने उपयुक्त आहेत.
१. वृक्षासन
वृक्षासन करण्यासाठी सरळ उभे रहा. एक पाय गुडघ्यात वाकवा आणि त्याचा तळवा, दुसऱ्या पायाच्या मांडीवर लावा. आता दोन्ही हात वर घ्या आणि एकमेकांना जोडा. नजर समोरच्या बाजूने स्थिर ठेवा. ही आसन अवस्था १५ ते २० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. यानंतर पुन्हा दुसऱ्या पायाने अशाच पद्धतीने आसन करा. हिप्ससोबतच मांडीवरची चरबी कमी होण्यासाठीही मदत होईल.
२. उत्कटासन
उत्कटासन करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा. दोन्ही हात वर करा आणि एकमेकांना समांतर ठेवा. यानंतर दाेन्ही पाय गुडघ्यातून वाकवा आणि जणू काही आपण खुर्चीवर बसणार आहोत, अशा पद्धतीने आपले शरीराची अवस्था ठेवा. ही अवस्था २५ ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना पाठीचा कणा आणि दोन्ही हात ताठ ठेवावेत.
३. नटराजासन
नटराजासन करायला थोडे अवघड आहे. पण नियमित सराव केल्यास ते तुम्हाला अगदी सहज करता येईल. नटराजासन करण्यासाठी सरळ उभे रहा. उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि मागच्या बाजूने वर घ्या. उजव्या हाताने उजवा तळपाय पकडा. डावा हात समोरच्या दिशेने लांबवावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. ही आसन अवस्था १५ ते २० सेकंद टिकवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पायाने असेच आसन करावे.
४. उष्ट्रासन
उष्ट्रासन करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. यानंतर दोन्ही हात मागे करून दोन्ही पायांचे तळवे पकडा. मान वर करून नजर छताकडे स्थिर ठेवा. ही आसनस्थिती २५ ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.