कष्टाच्या कामापेक्षा ऑफीसमध्ये बसून काम करणे अतिशय सोयीचे आणि सोपे असते असे आपल्याला वाटते. मात्र एकाच स्थितीत कित्येक तास बसून काम करणे वाटते तितके सोपे नाही. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मान आणि खांद्यांचे दुखणे, डोळ्याच्या समस्या अशा आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. बैठे काम असल्याने ते आरामदायी असते असे जरी आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात ते तसे नसते. कामाच्या नादात आपल्याला हे दुखणे लक्षात येत नाही, पण नंतर ते इतके वाढते की ते सहन न होण्याइतके असते (How To Take Care Of Neck and Shoulder Pain).
या दुखण्याचे गंभीर परीणाम म्हणजे व्हर्टीगो आणि सर्व्हायकल स्पॉंडीलायसिस होण्याची शक्यता असते. लॅपटॉपवर सतत एकाच स्थितीत बसल्याने मान आणि खांदे खूप अवघडून जातात. द योगिनी वर्ल्ड या इन्स्टाग्राम पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ३ सोपे व्यायामप्रकार सांगितले असून नियमितपणे हे व्यायाम केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. खांदे आणि मानेच्या स्नायूंना वेळीच व्यायाम दिला नाही तर हे दुखणे वाढत जाते. यासाठीच खांद्याचे आणि मानेचे कोणते व्यायाम करायचे ते पाहूया...
१. दोन्ही हातात कोणताही एक पट्टा घेऊन हात एकदा पुढे घ्यायचे आणि मग खांद्यातून हात मागे करायचे. खांद्याच्या स्नायूंना यामुळे ताण पडतो आणि त्यांना वंगण मिळण्यास मदत होते.
२. हात मागे घेऊन हाच बेल्ट दोन्ही हातात धरायचा आणि हात मागच्या बाजुला वर-खाली करायचे. हे किमान १० ते २० वेळा केल्यास खांदे मोकळे होण्यास याचा चांगला उपयोग होतो.
३. हातात एक ब्लॉक घ्यायचा आणि हात डोक्यावरुन गोलाकार फिरवायचे. एकदा उजव्या बाजुने आणि एकदा डाव्या बाजुने असे १० ते १२ वेळा फिरवायचे. यामुळेही खांदे आणि मानेचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.