कोरोनाकाळानं हे शिकवलंच की जान है, तो जहान है.. त्यात आता हे वर्षअखेरीचे दिवस. म्हणजे नेहमीप्रमाणे संकल्पांचे. यंदातरी मी ‘फिट’च होणार, पोट कमी करणार, स्टॅमिना वाढला पाहिजे, वजन घटवलंच पाहिजे हे स्वत:ला निक्षून सांगण्याचे दिवस आणि मग येत्या १ जानेवारीपासून (नियमित) काय काय करणार, याचा अभ्यास सुरू होतो. जिम लावून टाकावं का याचाही विचार मनात येतोच. घरून काम करणं सुरू राहणार की जाणार या विवंचनेत काही, तर काहींना पुन्हा ते ओमायक्रॉन वाढणार का? याचं टेन्शन. काहीही असलं तरी एक गोष्ट शिल्लकच राहते की किमान इन्स्टावर फोटो सतत टाकता येतील एवढा तरी लूक चेंज झालाच पाहिजे, मस्त ग्लो आला पाहिजे चेहऱ्यावर, फिट व्हायला पाहिजे. एकूण तरुण जगातली ही दोन अस्थिर वर्षे पाहता २०२२ मध्ये फिटनेस ट्रेण्ड काय असतील, असे आडाखे बांधणे आताच सुरू झाले आहे.
हाय इंटेन्सिटी वर्कआऊटच्या तरुण जगात काही गोष्टी जुन्याच असणार आहेत, हे विशेष.
१. चालायला लागा..
२०२२ मध्ये चालणं हा ट्रेण्ड तरुण जगात वाढणार, हे नक्की. चालायला जायचं तर ना पैसे लागतात, ना काही सुविधा. फुकटात होणारा हा मोलाचा व्यायाम आहे. येतं वर्ष आर्थिकदृष्ट्या आपल्यासाठी कोणती आव्हानं घेऊन येणार हे माहीत नसल्यानं चालणं हा व्यायाम सगळ्यांना परवडणारा आहे. फक्त रमतगमत चालायचं की घाम निघतो फास्ट चालायचं हा ज्याचा त्याचा निर्णय.
२. हायब्रिड लाइफस्टाइल, हायब्रिड व्यायाम
कोरोनामुळे लोकांन वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन कॉलेज करण्याची वेळ आली. पण आता कॉलेज सुरू झाले, काहींना निदान ३ दिवस, तरी ऑफिसला जावे लागते. त्यालाच आताशा हायब्रिड वर्क कल्चर असे म्हणतात. त्यामुळे तसे व्यायामही बदलणार. अनेकजण ३ दिवस जिमला जातील, ३ दिवस ऑनलाइन व्हिडीओ पाहून व्यायाम करतील. व्यायामही हायब्रिड होणार, हे नक्की. तुम्ही स्वीकारणार का येत्या वर्षात हायब्रिड व्यायाम.
३. फिटनेस ॲप, स्मार्ट व्यायाम
व्यायाम करताना फिटनेस ॲप वापरणं, स्मार्ट साधनं वापरणं याची सुरुवात काही वर्षांपासून झाली होती. पण आपल्या स्लिम ट्रिम फिगरबाबत जास्तच सजग असणाऱ्या तरुणी, महिला वापरतात असा समज होतात. फिटनेस ॲप वापरताना लोकांमधे बॉडी पॉझिव्हिटी नव्हती. त्यामुळे जाडजूड बायकांना हातात फिटनेस बॅण्ड बांधून चालणं अवघडल्यासारखं व्हायचं. पण आता आपला रंग, आपल्या शरीराचा आकार, आपली उंची हे आपलं वैशिष्ट्य आहे, या सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची मानसिकता वाढली आहे. फिटनेस ॲप हे केवळ फिगरसाठी नाही तर फिटनेससाठी वापरण्याचं प्रमाण २०२२ मधे वाढणार आहे. तुम्ही केली का नव्या ॲपची तयारी?
४. घर हेच जिम
होम जिमच्या दिशेनं आताच अनेक तरुण निघाले आहेत. काहीजणांनी ऑनलाइन काळात घरातच साधनं जमवली आणि आता अजूनही ते जमवत आहेत. त्यामुळे होम जिमचा ट्रेण्ड वाढणार आहे. घरीच करा व्यायाम, आणि मिरवा तुमची साधनं.
५. भागो दोस्त प्यारे
मॅरेथॉन अनेक दिवस न पळाल्याने येत्या वर्षात अनेकजण पुन्हा मॅरेथॉन पळण्यासाठी रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करतील अशी शक्यता आहे. येत्या काळात तरुण जगात पळण्याची क्रेझ वाढणार आहे. पळा पळा जोरात पळा.