फिट राहायचं तर रोज किमान अर्धा तास तरी चालावं असं तज्ज्ञ म्हणतात. अर्धा तास चालण्यानं शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात. छोट्या ते गंभीर आरोग्य समस्यांचा धोका टळतो. पण जेवढं चालणं फायद्याचं तितकंच उलटं चालणंही फायद्याचं, रिव्हर्स वाॅकमुळे मधुमेह, रक्तदाब , किडनीशी संबंधित आजार बरे होण्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असं तज्ज्ञ सांगतात. पण उलटं चालायचं ते कसं आणि किती?
Image: Google
सीधे रस्ते की उल्टी चाल ती कशी?
उलटं चालणं हा उत्तम कार्डियो व्यायाम आहे. या व्यायामाला रिव्हर्स वाॅक असं म्हणतात. उलटं चालणं बोलायला सोपं पण प्रत्यक्षात उलटं चालणं अवघड आहे. एकट्यानं तर उलटं चालण्याचा व्यायाम कधीच करु नये असं तज्ज्ञ म्हणतात. सोबतीला कोणीतरी घेऊन उलटं चालण्याचा व्यायाम करावा. 20 ते 30 मिनिटं उलटं चालण्यानं 5 महत्त्वाचे फायदे होतात.
रिव्हर्स वाॅकिंगचे फायदे
1. उलट चालण्याचा व्यायाम केल्यानं शरीराचा बॅलन्स उत्तम राखता येतो. सरळ चालण्यापेक्षा उलटं चालण्यानं मेंदूवर जास्त ताण येतो. यामुळे मेंदूचं कार्य उत्तम होण्याला चालना मिळते. मेंदू चांगल्या क्षमतेनं आणि गतीनं काम करु लागला की मेंदू आणि शरीरातला सुसंवाद राखला जातो. मन एकाग्र व्हायला मदत होते. मेंदुचं आरोग्य चांगलं राखलं जातं.
2. 20- 30 मिनिटं उलटं चालण्यामुळे गुडघ्यांचं दुखणं असल्यास ते कमी होतं. नेहमीच्या चालण्यातून गुडघ्यांवर येणारा ताण आणि त्यामुळे गुडघ्यांना येणारी सूज आणि वेदना या समस्या उलटं चालण्यामुळे दूर होतात.
Image: Google
3. उलटं चालण्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात यावर झालेल अभ्यास सांगतो की भीती, नैराश्य या मानसिक विकारात रिव्हर्स वाॅकचा औषधासारखा उपयोग होतो. मेंदू वेगानं काम तर करतो पण तो या व्यायामानं शांतही राहतो. त्याचा फायदा मानसिक आरोग्य सुदृढ राहाण्यावर होतो.
4. पायाचे स्नायू मजबूत होण्यासाठी उलटं चालण्याचा फायदा होतो. उलटं चालण्यामुळे पायांच्या स्नायुंचा जास्त चांगला व्यायाम होतो. म्हणून रिव्हर्स वाॅकचा सल्ला तज्ज्ञ देतात.
Image: Google
5. रोज थोडा वेळ उलटं चालण्यामुळे शरीराच्या पाठीमागच्या अवयवांचे स्नायू बळकट होतात. कंबरदुखी,पाठदुखी, मणक्याचं दुखणं उलटया चालण्यामुळे कमी होतं असं अभ्यास सांगतो. आरोग्यासाठी जास्त नाही तर किमान 5-10 मिनिटं तरी उलटं चालण्याचा व्यायाम करावा असं तज्ज्ञ म्हणतात.